रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

शांतीपूर्ण औद्योगिक संबंधांमुळे
महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक - मुख्यमंत्री
         ठाणे, दि. 7 - शांतीपूर्ण औद्योगिक संबंधांमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. देशाची प्रगती गु्ंतवणुकीशी जोडली गेली आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढले तरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. शांतता पूर्ण औद्योगिक संबंध, कामगारांचे कल्याण आणि परस्परांची साथ गुंतवणुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटकच्या 88 व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
             यावेळी केंद्रीय कामगार मंत्री मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, राज्याचे कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित, खा.सुरेश टावरे, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. संजीव रेड्डी. इंटकचे आशिया पॅसिफिक विभागाचे सरचिटणीस सुझुकी, झारखंडचे विरोधी पक्ष नेते राजेंद्र सिंग, खा.कुंठिया,यांच्यासह इंटकचे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
             मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, महाराष्ट्राची स्वतःची अशी एक औद्योगिक संस्कृती आहे. महाराष्ट्र सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. देशाच्या एकूण आर्थिक परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 34 टक्के आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकास कमी झाला तर रोजगारही कमी होईल. मात्र, परकीय गुंतवणूक झाली तर रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढेल. आणि त्यामुळे देशाचा विकास होईल. भांडवल, व्यवस्थापन, तंत्रज्ञान हे गुंतवणुकीसाठी फलदायी ठरणारे आहे.
             केंद्रीय कामगार  मंत्री मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मालक आणि मजुरांमध्ये सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. देशामध्ये औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी कामगारांचे हित पाहणाऱ्या इंटकने साथ द्यावी. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.कामगारांचे हक्क, सुरक्षा, कल्याण आणि आरोग्य याबरोबर कामगारांसाठी असणारे कायदे तसेच सरकारी योजना यांचा त्यांनी आढावा घेतला.                                                                
             विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. इंटकचे आशिया पॅसिफिकचे सरचिटणीस सुझुकी म्हणाले, जागतिक स्तरावर बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक आहे. रोजगार निर्मिती करून मजुरांना मुख्य प्रवाहात आणणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. स्वागतपर भाषणात इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीव रेड्डी यांनी इंटकच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रास्ताविक आ.जयप्रकाश छाजेड यांनी केले. इंटकचे सरचिटणीस राजेंद्र सिंग यांनी आभार मानले. या अधिवेशनास  देशभरातून इंटकचे 1500 पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा