शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२


म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी
मुंबईतील आमदारांची दि. 11 रोजी बैठक : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6: मुंबईतील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व आमदारांची बैठक गुरुवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी बोलाविली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
विधीमंडळाच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला असता मुंबईतील सर्व आमदारांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मी दिले होते.  त्यादृष्टीने ही बैठक आयोजित केली आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
मुंबईतील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी मुंबई विकास नियंत्रण नियमावलीतील नियम 33 (5) नुसार 2.5 चटईक्षेत्र निर्देशांक लागू करण्यात आला आहे.  त्यामागील उद्देश असा आहे की, सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती व्हावी. मुंबईतील जमीन उपलब्धतेची मर्यादा लक्षात घेऊन म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासामध्ये म्हाडाने अधिमुल्य (प्रिमियम) स्वीकारण्याऐवजी तयार घरे घेणे हितावह असल्याने म्हाडा प्राधिकरणाने सप्टेंबर 2010 मध्ये तसे धोरण स्वीकारले आहे.  तथापि, काही घटकांनी म्हाडाला तयार घरे देण्याऐवजी प्रिमियम देण्याचा आग्रह धरलेला आहे.  त्यांच्या आग्रहामुळे परवडणाऱ्या जास्त घरांची निर्मिती होण्यामध्ये बाधा येणार आहे  व ते म्हाडाच्या मूळ उद्देशाच्या आड येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मोर्चासारख्या आंदोलनांमुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये व लोकांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मोर्चाबाबत फेरविचार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे गटनेते श्री.सुभाष देसाई यांना केले आहे. 
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा