महिला लोककलावंतांसाठी विमा योजना
आणण्यासाठी शासन प्रयत्न करील
-मुख्यमंत्री
मुंबई, दि.22: महिला लोककलावंतांसाठी विमा योजना आणण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केले जातील असे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व लोकरंग सांस्कृतिक मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले
की, महाराष्ट्राच्या समाज जीवनात लोककलांना अनन्य साधारण महत्व आहे. विविध लोककलांमध्ये नेहमीच पुरुष हा सूत्रधार राहीला असून महिला कलावंत दुय्यमस्थानी राहिल्या आहेत. या लोककलांना आणि त्या कला जिवंत ठेवणाऱ्या लोककलावंतांना राजमान्यता देण्याचा शासन प्रयत्न
करीत आहे.
विठाबाईंच्या स्मारकासाठी प्रयत्न:
ते म्हणाले,
मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीला अनुदानावर आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे विठाबाई नारायणगावकर यांच्या नारायणगांव येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन निश्चितपणे पावले उचलील. महिला कलावंतांच्या घरांसाठी नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील तथापि सद्या भूखंड वाटपास न्यायालयाची स्थगिती आहे. ती उठल्यानंतर विचार केला जाईल.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले
की, लोककला व मनोरंजन यातून मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. तालुक्याच्या ठिकाणीही प्रेक्षकगृह होतील असा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. आजचे संमेलन हा स्त्रीशक्तीचा जागर असून महिला लोककलावंतांची हजेरी पाहता हे संमेलन
पूर्णपणे यशस्वी झाले आहे. लोककला जिवंत ठेवण्यासाठी तसेच या कलांचा प्रसार देशभर व जगभर व्हावा यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाने काम करावे, असेही ते म्हणाले.
संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती माया जाधव यांनी या संमेलनाला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून संबोधून गौरव केला. चूल आणि मूल यातून आता महिला मुक्त झाल्या आहेत. महिला लोककलावंतांना हे संमेलन नक्कीच नवशक्ती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकरंजनातून लोक प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या विठ्ठाबाई नारायणगावकर, कांताबाई सातारकर तर थेट नव्या पिढीतील कलावंतांचा उल्लेख करुन त्यांनी स्त्री शक्तीचा जागर असाच पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. शासनाने लोककलेच्या विकासाचा विचार करावा असे त्या म्हणाल्या.
विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे तसेच अभिनेत्री सोनाली
कुलकर्णी, संमेलनाच्या कार्याध्यक्ष राही
भिडे यांचीही
भाषणे झाली.महिला व बाल विकास मंत्री तथा या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी महिला लोककलांच्या संमेलनास पाठबळ देणे हा महिला सबलीकरणाचा भाग असल्याचे सांगून शासनाने महिला लोककलावंतांच्या संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन, चित्रपट महोत्सव या प्रमाणे अनुदान द्यावे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार, प्रसारासाठी महिला लोककला पथकांना मोठया प्रमाणात कार्यक्रम दिले जावेत असे सांगून त्या म्हणाल्या लोककलावंतांनी लोक कलेच्या
माध्यमातून मोठे समाज प्रबोधन केले असल्याचा गौरव त्यांनी यावेळी केला.
संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती
वसंतराव डावखरे, संमलेनाच्या अध्यक्षा श्रीमती माया जाधव, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री तथा संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, खासदार एकनाथ गायकवाड, चित्रपट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संमेलनाच्या कार्याध्यक्षा राही भिडे, उपकार्याध्यक्षा श्रीमती शैला खांडगे, साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, सुमंगल पब्लिकेशनचे संचालक जयराज साळगांवकर, पु. ल. देशपांडे अकादमीच्या प्रकल्प संचालिका श्रीमती सुप्रभा अगरवाल आदी मान्यवर उपस्थित
होते.
या संमेलनात राजस्थान,
त्रिपूरा, छत्तीसगड आदी राज्यातील महिला लोककलावंत त्याचप्रमाणे राज्यातील महिला कलावंत मोठया
संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा