शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२



कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला
अधिक चालना देणारे पुस्तक
                                                            - मुख्यमंत्री

       मुंबई, दि. 12 : कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रयत्नामुळे तयार झालेले चॅरिस्मॅटीक कोल्हापूर हे कॉपीटेबल पुस्तक कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना देईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज या पुस्तकाचे प्रकाशन करतांना व्यक्त केला. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे मार्केटींग करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्याकरीता अशी कॉपीटेबल पुस्तके तयार व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट यांनी संयुक्तपणे चॅरिस्मॅटीक कोल्हापूर या कॉपीटेबल पुस्तकाचा, आनंद बी. पाटील यांनी लिहिलेल्या इन सर्च ऑफ कोल्हापूर या पुस्तकाचा आणि सुहाना सफर, कोल्हापूर या ध्वनीचित्रफितीचा प्रकाशन समारंभ आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केला होता. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, पर्यटन विभागाचे अधिकारी, कोल्हापूरवासीय आणि कोल्हापूर प्रेमी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी हा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यकाळातील महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यकाळात अनेक नवीन संकल्पना अधिकाऱ्यांना राबविता येतात. श्री.देशमुख यांनी कोल्हापूरला पर्यटनाच्या नकाशात ठळक करण्याच्या दृष्टीने सुरु केलेले उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहेत. कोल्हापूरला ऐतिहासीक आणि धार्मिक पार्श्वभूमी तर आहेच परंतु कला, संस्कृती, साहित्य, क्रिडा, उद्योग आदी क्षेत्रातही कोल्हापूरचे महत्त्वाचे स्थान आहे. गगनबावडा, चंदगड यासारखी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ठिकाणेही कोल्हापूरमध्ये आहेत. कोल्हापूरची ही अप्रचलित वैशिष्ट्ये या कॉपीटेबल पुस्तकामुळे जगासमोर येतील आणि देशातील व परदेशातील पर्यटक कोल्हापूरकडे आकृष्ट होतील.  चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरमध्ये चित्रनगरीचा विकास
करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे अशी माहितीही श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली. टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र हे अधिक रोजगार मिळवून देणारे असल्यामुळे केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या जाहिरातीकरुन त्याबाबत प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे.  महाराष्ट्रात येणारा पर्यटक महाराष्ट्रात अधिक काळ वास्तव्य करेल यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
            कोल्हापूरला अनेक कारणांने आपण भेट देतो. परंतु कोल्हापूरमध्ये इतर किती वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत याची कल्पना हे पुस्तक पाहील्यावर येते असे प्रशंसोद्‌गार काढून श्री.भुजबळ म्हणाले की, सध्याचा जमाना जाहिरातीचा आहे. राज्याकडे असलेला पर्यटनाच्या खजिन्याची माहिती आकर्षकपणे लोकांसमोर ठेवल्याशिवाय पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होणार नाहीत. पर्यटन हा सगळ्यात मोठा उद्योग आहे. पर्यटनामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे पर्यटनाचा विकास होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्य आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या पर्यटनाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणारे श्री.देशमुख आता दादासाहेब फाळके चित्रनगरीत महत्त्वाच्या पदावर आहेत. श्री.देशमुख यांनी आता बॉलिवूड टूरिझम वाढविण्यासाठी प्रयत्न करावा अशी सूचनाही श्री.भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
            श्री.देशमुख यांनी कोल्हापूर शहराच्या वैशिष्ट्यांची माहिती देऊन कॉपीटेबल बुकची संकल्पना स्पष्ट केली. हे कॉपीटेबल पुस्तक विमानतळावर आणि हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. या समारंभात कॉपीटेबल बुकचे छायाचित्रकार संदेश भंडारे आणि माहिती संकलक श्रीमती निंबाळकर यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा