बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२


देशातील सर्वात जास्त निर्यात महाराष्ट्रातून
                                                -मुख्यमंत्री

       मुंबई, दि. 9 :  राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा 13 टक्के असून गेल्या चार वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेने 9 टक्के विकास गाठला आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त निर्यात करणारे राज्य असून तयार कपडे, धातू उत्पादने, कृषी आधारीत उत्पादन, प्लास्टीकच्या वस्तू या क्षेत्रात प्रामुख्याने निर्यात केली जात आहे. ऊर्जा ही जलद आर्थिक विकासाची मूलभूत गरज असल्याने महाराष्ट्राला डिसेंबर 2012 पर्यंत भारनियमनमुक्त करण्याच्या दृष्टीने शासनाचा प्रयत्न आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (CII) राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचे आयोजन हॉटेल  ताजमहाल पॅलेस येथे आज करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सीआयआय चे अध्यक्ष आदी गोदरेज, महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी, पश्चिम विभागाचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, इन्फोसीस लिमिटेडचे एस गोपालकृष्णन, आदीसह देशातील मान्यवर उद्योजक यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले,  राज्याचे नवीन औद्योगिक धोरण प्रस्तावित असून कृषी आधारीत उत्पादन प्रक्रीया क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा आगामी काळात करण्यात येणार आहेत लवकरच यासाठी नवीन धारेण जाहीर करण्यात येणार आहे. उद्योगक्षेत्रात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहीले आहे.  नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे राज्यात 1 कोटी रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच  एकात्मिक वस्त्रोद्योग पार्कसना विशेष सवलती देण्यात येणार आहेत. देशातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प जमीन संपादन, पुनर्वसन या कारणांसाठी प्रलंबित असले तरी नवीन जमीन संपादन कायदा प्रस्तावित असून यामूळे प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यांनी यावेळी सांगितले.

            मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे  सर्व समावेशक विकासासाठी  शासन  कटीबद्ध आहे.  मागास भागाचा समतोल औद्योगिक विकास करणे गरजेचे असून, गरीबांना सर्व सुविधायुक्त घरे, पाणी पुरवठा, आहार, आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीकोनातून शासन प्रयत्न करीत आहे.  गेल्या वर्ष भरात शासनांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये धारावी विकास, मिहान, मुंबई विकास, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, वाढीव तळक्षेत्र, या प्रकल्पांमुळे नागरी आणि औद्योगिक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.      
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा