गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२


बांधकाम उद्योगाने 10 टक्के
विकासदर गाठला - मुख्यमंत्री

मुंबई, दि.18: 2012 या वर्षात आतापर्यंत बांधकाम उद्योगाने 10 टक्के विकासाचा दर गाठला असून बांधकाम व्यवसायास चालना देण्यासाठी पूरक अशा शासकीय धोरणामुळेच या अर्ध आर्थिक वर्षात 16.53 दशलक्ष डॉलर्स किंमतीची थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काढले. 
एक्झिबिशन सेन्टर, गोरेगांव येथे इकॉनॉमिक टाइम्स ने आयोजित केलेल्या ‘एटेक 2012’  प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
या क्षेत्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासकीय धोरण निश्चितपणे मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला ते म्हणाले की, तसेच सार्वजनिक, खाजगी भागीदारीतून या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील.  आपल्या राज्यात अतिशय कुशल असे मनुष्यबळ व बौध्दिकवर्ग उपलब्ध असून अतिशय धडाडीचे उद्योजक आहेत.  उद्योगास पोषक असे वातावरण निर्माण झाल्यामुळे आणि या क्षेत्रात लागणारे परवाने अतिशय सुलभरित्या प्राप्त होत असल्याने या क्षेत्रातील स्पर्धेला जागतिक स्तरावर आपण अतिशय सक्षमपणे तोंड देत आहोत. 
आज या क्षेत्रातील अनेक दिग्गज येथे उपस्थित आहेत. 20 हजार चौरसफूटापेक्षा अधिक क्षेत्रावर विकास कामांना कांही बंधने घालण्यात आली आहेत. हरित क्षेत्र इमारतींना आम्ही सवलती दिलेल्या आहेत. यामध्ये सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर व विजेच्या कमी वापर,  पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, बांधकामासाठी पर्यावरण पूरक साधनसामुग्रीचा वापर याचा समावेश आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले या क्षेत्रात हरित इमारती निर्माण व्हाव्यात यासाठी शासकीय इमारतीं, सार्वजनिक कार्यालये यांनी अटींचे पालन करावेत असे बंधन शासनाने घातले आहे. आम्हाला पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असून त्याशिवाय आता पर्याय नाही.  आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा या मुंबई महानगरात विकसित करीत आहोत.  भाडेतत्वावरील घरे हा त्यापैकी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीकोनातून झोपडट्टयांची वाढ रोखण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 45 प्रकल्पांसाठी जमिन देण्यात आली असून पुढील दोन वर्षात भाडे तत्वावरील एक लाख घरांची निर्मिती होईल. लवकरच ठाणे, मानपाडा येथे भाडेतत्वावरील घरे प्रकल्पातून 3000 सदनिका बांधल्या जातील. या सदनिकांच्या क्षेत्रात बालवाडी, दुकाने, कल्याणकेंद्र अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये जे नोकरीच्या, करिअरच्या शोधात येतात त्यांना किफायतशीर किंमतीत छोटी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 160 ते 300 चौरस फूटाच्या सदनिकांचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अधिक घरांच्या स्टॉक निर्माण व्हावा यासाठी आम्ही नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली असून त्यातून विशेष नगर वसाहती तसेच किफायतशीर भाडेतत्वावरील घरे या योजना एकत्रित केल्या जाऊन कार्यान्वित होतील.
मेट्रो, मोनो रेल, इतर पायाभुत सुविधा प्रकल्प कालबध्द कार्यक्रम राबवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. आपण आपल्या सूचना, शिफारशी या परिषदेतून मांडाव्यात या सूचनांचे आम्ही निश्चितच स्वागत करु. मुंबईच्या विकासात आपल्या अमोल सहकार्याची आम्हाला गरज आहे असे आवाहन मुख्यमंत्रयांनी यावेळी केले.
          ए.एल.एल. डिझाईन (युके), रिकार्डो ई बोफिल, (स्पेन), अँड्रे टेम्स् (ऑस्ट्रेलिया), वास्तुविशारद हफिझ कॉन्ट्रॅक्टर, तसेच या क्षेत्रातील अनेक वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.
-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा