मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२


ज्येष्ठ नागरिक धोरणाचा मसुदा लवकरच
राज्य मंत्रिमंडळासमोर -मुख्यमंत्री

मुंबई, दि. 4 : ज्येष्ठ नागरिक धोरण ठरविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा मसुदा लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, तसेच आरोग्य विमा योजना, निवृत्तीवेतनातील वाढ आदी प्रश्नांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. या शिष्टमंडळात आमदार गिरीष बापट, आमदार मोहन जोशी, आमदार चंद्रकात मोकाटे, डॉ. शंकर किंजवडेकर, दिगंबर चापके, मधुकर कुलकर्णी, अण्णासाहेब टेकाळे, अण्णा कोडोलीकर, रमणभाई शहा, नगरसेवक प्रशांत बधे यांचा समावेश होता.
श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा दिलेल्या आहेत. श्रावणबाळ योजनेखाली दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्तीवेतन देण्यात येते. एसटी महामंडळाच्या बसमध्ये सवलत दिली जाते. राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा मसुदा तयार असून त्यात निर्वाह कल्याण मंडळ, जिल्हा समन्वय समिती आदींची तरतूद करण्यात आली आहे. हे धोरण लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
शिष्टमंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खाते निर्माण करावे, विरंगुळा केंद्रे सुरू करावीत, एसटी प्रवासाच्या सवलतीची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे करावी, आरोग्य विमा योजना सुरू करावी आदी मागण्या केल्या.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा