पाणलोट क्षेत्र विकासाच्या
कामांमध्ये
ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा :
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 सप्टेंबर : राज्यावरील दुष्काळाचे संकट
कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी जलसंधारणाच्या आणि पाणलोट क्षेत्र विकासाच्या
कामांमध्ये ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायतींचा सहभाग खूप मोलाचा ठरणार आहे. आदर्श गावसारख्या संकल्पनेतून विविध प्रकल्प
राबवून हे करणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज
केले.
आदर्श गांव संकल्प व प्रकल्प समितीचे
कार्याध्यक्ष श्री.पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील हिवरे बाजार येथील एका
शिष्टमंडळाने श्री.चव्हाण यांची आज भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. श्री.पवार यांनी श्री.चव्हाण यांच्यासमोर
टंचाईसदृश परिस्थितीत करावयाचे नियोजन आणि उपाययोजना यांच्याबाबत सादरीकरण केले.
मुख्यमंत्री म्हणाले गेली सलग दोन वर्षे राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. फक्त
महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी कमी होत आहे आणि
पाऊस पडण्याचे पारंपरिक वेळापत्रक बिघडत चालले आहे. यामुळे पावसाचे पाणी शक्य तेथे अडवून जमिनीत
जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा वापर विचारपूर्वक करणे हेच उपाय योजावे लागणार आहेत.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे मोठ्या
प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. हिवरे
बाजार मॉडेल म्हणून प्रसिध्द असलेले खोल सलग समपातळी चर (डीप सीसीटी) राज्यातील
प्रत्येक पाणलोट क्षेत्रात खोदून पाणी संचयाचे प्रयत्न करण्याची शक्यता अजमावून
पाहिली जाईल.
मृदसंधारण, जलसंधारण, पाणलोटांचा विकास,
ठिबक सिंचनासारख्या सुक्ष्म सिंचन पध्दतींचा जास्तीत जास्त वापर, विंधन विहिरींवर
व त्यांच्या खोलीवर नियंत्रण, नालाबंडिंग, सिमेंटचे पक्के बंधारे आदी उपाय योजून
पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. मात्र,
या सगळ्या प्रक्रियेत ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग
घेणे जरुरीचे आहे असे श्री.चव्हाण म्हणाले.
श्री.पोपटराव पवार यांनी प्रत्येक
पाणलोटात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी केली. यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या भागात नेमका किती
पाऊस पडला याची माहिती मिळून जलसंधारणांच्या कामांचे नियोजन करणे सुलभ होईल. पाण्याचा ताळेबंद आणि पीक नियोजन या बाबींचा
समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा अशीही मागणी त्यांनी केली.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा