सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२


मंत्रालय लोकशाही दिनी 3 अर्जांवर सुनावणी
        मुंबई, दि. 3 : खासगी संस्थेला शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी जमीन देतांना सर्व शासकीय बाबी तपासून निर्णय घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
            दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  आज आयोजित केलेल्या लोकशाही दिनी आलेल्या अर्जावर सुनावणी करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस. मीना, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चॅटर्जी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            शैक्षणिक संस्था सुरु करण्यासंदर्भात जमीन मिळावी या संदर्भातील अर्जावर सुनावणी करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी जागा मागण्यात आली आहे. त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था सुरु करण्याची आवश्यकता आहे का ? अर्जदारांचा प्रोजेक्ट संदर्भातील संपूर्ण प्रस्ताव तसेच अन्य बाबींची तपासणी करुन जागा देताना नियमानुसार निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
आजच्या लोकशाही दिनी एकूण तीन अर्जावर सुनावणी झाली. या पैकी दोन अर्ज महसूल विभागांसंबधी होते. तर एक अर्ज गृहनिर्माण विभागासंबंधी होता. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सखोल माहिती घेतली. अर्जदारांची बाजू समजून घेतली व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा