गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२



लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
सुवर्णमध्य साधणे आवश्यक : मुख्यमंत्री
        मुंबई, दि. 6 : लोकशाहीचा आत्मा असलेल्या लोकप्रतिनिधींनी बनविलेले कायदे कठोरपणे राबविणारे अधिकारी आणि हे कायदे बनविणारे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अनेकवेळा संघर्षाचे प्रसंग येतात. खरेतर हा एक कळीचा मुद्दा आहे. मात्र याबाबतीत दोन्ही बाजुनी लक्ष्मणरेषा आखुन सुवर्णमध्य साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
        पत्रकार भगवान दातार यांनी संपादित केलेल्या अमेय प्रकाशनच्या `कलेक्टिव्ह एनर्जी` ध्यास विकासाचा...या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निरंजन डावखरे, या पुस्तकात ज्यांच्या यशकथा प्रसिद्ध झाल्या आहेत ते प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रवीण गेडाम, ए. एल. जऱ्हाड, नितीन खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
        मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राजेशाहीची परंपरा असलेल्या आपल्या देशात लोकशाहीची परंपरा अजिबात नाही. ग्रीस, रोमसारख्या लोकशाहीची प्राचीन परंपरा असलेल्या देशांकडुन ही संकल्पना आपण आणली. यामुळे त्या देशांमधील अनेक उपक्रमांचा प्रभाव आपल्या लोकशाही व्यवस्थेवर आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु आदी नेत्यांनी इंग्लंडसारख्या देशात शिक्षणाकरिता वास्तव्य केल्याने त्यांना याबाबतची व्यापक दृष्टी आली. यातूनच स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे सुनियोजित व्यवस्था असलेली लोकशाही पद्धती साकारली.
        श्री. चव्हाण म्हणाले की, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी विधिमंडळाच्या माध्यमातून अनेक कायदे करतात. त्याआधारे नियम बनविण्यात येतात. हे कायदे अणि नियमांची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींचीच असते आणि ते कायदे पाळण्याची, नियमांनुसार काम करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. मात्र बरेचदा असे दिसते की, कडकपणे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि संबधित लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्षाचे प्रसंग येतात. अतिक्रमण हटावसारख्या मोहिमांचे उदाहरण यासाठी पुरेसे आहे. खरेतर या लोकप्रतिनिधींनीच बनविलेले कायदे तो अधिकारी पाळत असतो, हा एक विरोधाभासाचा प्रकार आहे. हा हस्तक्षेप किती व्हावा, हा यातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा काही अधिकारी लोकप्रियतेसाठी असा संघर्ष करताना दिसतात, हेसुद्धा गैर आहे. तो लोकशाहीच्या हिताचा नाही. यासाठीच दोन्ही बाजुंनी लक्ष्मणरेषा ठरवुन सुवर्णमध्य गाठणे आवश्यक आहे.
        या पुस्तकाच्या संकल्पनेचे स्वागत करुन मुख्यमंत्री म्हणाले की, सामाजिक दृष्टीकोन ठेवून वेगळ्या वाटा शोधणाऱ्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या यशकथा असलेले `कलेक्टिव्ह एनर्जी` हे पुस्तक नवीन अधिकाऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल. या पुस्तकात भारतीय प्रशासकीय सेवेतील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ते जिल्हाधिकारीपदी असताना राबविलेल्या यशकथांचा समावेश आहे. मात्र अनेक विभागांमधील राज्य सरकारी अधिकारीही असे अनोखे उपक्रम राबवित असतात. याचीही दखल अमेय प्रकाशनाने घ्यावी. याबरोबरच या अधिकाऱ्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल झाला, हे समजण्यासाठी काही नागरिकांच्या प्रतिक्रियांचा समावेशही या पुस्तकात करावा, अशी सूचना त्यांनी केली.
पुस्तकांची मालिका करावी : थोरात
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, शासकीय चौकट सांभाळुन काहीतरी आगळेवेगळे काम करणारे अधिकारी या पुस्तकामुळे उजेडात आले आहेत. त्यांच्या या यशकथांमुळे  प्रशासकीय सेवेत नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांना एक नवी दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय सेवेत येणारा तरुण हा एक स्वप्न घेऊन सेवेत दाखल होतो. मात्र त्यापैकी काहीजण दीर्घकाळ लक्षात राहील, असे काम करुन जातात. हे काम पुस्तकरुपाने लोकांसमोर आणण्याचे खुप महत्वाचे काम अमेय प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकानंतर त्यांनी आता अशाच अन्य अधिकाऱ्यांची दखल घेऊन अशा पुस्तकांची मालिका तयार करावी, अशी सूचना श्री. थोरात यांनी केली.
प्रारंभी पुस्तकाचे संपादक भगवान दातार यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रकाशक उल्हास लाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले. या पुस्तकामध्ये सर्वश्री प्रवीण गेडाम, आबासाहेब जऱ्हाड, नीतिन खाडे, चंद्रकांत दळवी, विकास देशमुख, श्रावण हर्डीकर, अभिषेक कृष्णा, तुकाराम मुंडे, राहुल रंजन महिवाल, चंद्रशेखर ओक, सौरभ राव आणि शाम वर्धने या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी म्हणुन काम करताना राबविलेल्या अनोख्या आणि यशस्वी प्रयोगांचा आलेख ओघवत्या भाषेत चितारण्यात आला आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा