गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२


भारत व नेपाळमधील संबंध अधिक दृढ झाल्यास
गुंतवणुकीला चालना मिळेल  - मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 13 : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असल्याने शेजारी राष्ट्र नेपाळ आणि भारतामधील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाल्यास या दोन राष्ट्रातील गुंतवणुकीलाही चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.
          नेपाळमधील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नेपाळ पत्रकार महासंघाचे सरचिटणीस ओम शर्मा, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, प्रेस क्लब ऑफ मुंबईचे गुरबिर सिंग, जतीन देसाई, अजित जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
          महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीत प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याने येथे जागतिक दर्जाची शैक्षणिक केंद्रे व्हावीत यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील बॉलिवूड, पर्यटन आणि विस्तीर्ण सागरी किनारा त्याचप्रमाणे येथे होणारे विविध प्रकारचे सण-उत्सव आदींमुळे येथील वातावरण नेहमीच आनंदी व सौहार्दपूर्ण आहे. 
          आर्थिक मंदी, हवामानातील बदल आणि नवनवीन तंत्रज्ञान यांचे आज आव्हान आहे. असे असले तरी नेपाळ आणि भारताचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संबंध अधिक चांगले राहावेत यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहील. याकरीता दोन्ही देशांनी सहकार्याच्या भुमिकेतून काम करुया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

          नेपाळ पत्रकार महासंघाचे ओम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळातील अनेक सदस्यांनी नेपाळ मधील विविध घडामोडींची माहिती देऊन महाराष्ट्रातील अधिकतम उद्योगांनी नेपाळमध्ये गुंतवणूक करावी ज्यामुळे नेपाळला अधिक मदत होईल असे आवाहन केले. नेपाळमधून भारतात नोकरी-व्यवसायासाठी आलेल्या हजारो नेपाळी नागरिकांना सुरक्षा, सुविधा व अन्य प्रकारची मदत मिळावी यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
          प्रारंभी गुरबिर सिंग यांनी नेपाळ मधील पत्रकारांचा महाराष्ट्र भेटीचा उद्देश आणि त्यांची ओळख करुन दिली. यावेळी नेपाळ पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना
श्री पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती, शाल आणि नेपाळी टोपी भेट देण्यात आली.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा