यहां इतना सन्नाटा
क्युँ है भाई……हा शोलेमधला काळीज हलवणारा डायलॉग कातर आवाजात बोलणारे ज्येष्ठ चरित्र
अभिनेते ए. के. हंगल आज आपल्याला सोडुन गेले. स्व. हंगल यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला
आणि कामगारांच्या हक्कांबाबत ते सतत जागरुक राहिले, ही गोष्ट फारच कमी जणांना
माहित असेल. पृथ्वी थिएटर आणि इप्टा (इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन) च्या
माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर अनेक आशयघन आणि विचारप्रवर्तक नाटके आणली.
चित्रपटामधील बटबटीतपणा, हिंसाचार, अश्लिलता याला त्यांनी या क्षेत्रात राहुनही
सातत्याने विरोध केला. धर्मनिरपेक्षता आणि मार्क्सवादी विचारसरणीचा त्यांच्यावरील
प्रभाव चित्रपटासारख्या मोहमयी दुनियेतही अखेरपर्यंत कायम राहिला. त्यांच्या
निधनाने एक विचारवंत आणि आदरणीय व्यक्तिमत्वाला आपण सारे मुकलो आहोत.
मुख्यमंत्र्यांचा
जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करताना अनेक व्याप करावे लागतात. यात सर्वात दु:खदायक
काम असते ते मान्यवरांच्या निधनाबद्दल मा. मुख्यमंत्री यांचा शोकसंदेश तयार करुन त्याच्या
मसुद्याला मान्यता घेऊन तो प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी पाठविण्याचे. अतिशय जबाबदारीचे
हे काम बरेचदा कसोटी पाहणारे असते. एखाद्या मान्यवरांचे आकस्मिक (त्यातही अपरात्री,
उशीरा किंवा सुट्टीच्या दिवशी) निधन झाले, तर संदर्भ मिळवताना तारांबळ उडते. माध्यमांची
घाई म्हणजे तगादाच सुरु असतो. मात्र अशा बाबतीत घाई करुनही चालत नाही. एखादा शब्द इकडेतिकडे
झाला की संपलेच.
गेल्या
दोन महिन्यात अनेक महनीय व्यक्तींनी आपला कायमचा निरोप घेतला. संगीतकार बाळ पळसुले,
प्रा. राम बापट, कॅप्टन लक्ष्मी सहगल, मा. खासदार बाळ आपटे, मृणालताई गोरे, दारासिंग,
माजी मंत्री प्रीतमकुमार शेगावकर, अभिनेता राजेश खन्ना, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय
मंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर कुंटे, माजी मंत्री दिग्विजय
खानविलकर, माजी विधानसभा अध्यक्ष शंकरराव जगताप आणि चरित्र अभिनेते ए. के. हंगल………यमराजाला
एक विनंती…आता थोडी विश्रांती घे बाबा….आम्हाला हे सगळे हवे होते…..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा