हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमळ
पित्याचे छत्र हरपले : मुख्यमंत्री
मुंबई दि.२६ : रुपेरी
पडद्यावर आणि पडद्यामागे देखील एक तत्वनिष्ठ, आदर्शवादी आणि चारित्र्यपूर्ण भूमिका
जगलेल्या ए. के. हंगल यांच्या जाण्याने आज हिंदी चित्रपट सृष्टीतील एका प्रेमळ
पित्याचे छत्रच जणू हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक
व्यक्त केला आहे.
पद्मभूषण पदवीने सन्मानित
श्री हंगल यांनी चित्रपटातील भूमिका देखील त्यांच्या तत्वाच्या आड येऊ दिल्या
नाहीत, एका अर्थाने त्यांनी केलेल्या भूमिका ते खऱ्या आयुष्यातही जगले. सकारात्मक
विचार देणाऱ्या सोज्वळ, सद् गुणी भूमिका करून त्यांनी केवळ लोकप्रियताच नव्हे तर
आदर, सन्मानही मिळविला, असे श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
स्व. हंगल यांनी
स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि कामगारांच्या हक्कांबाबत ते सतत जागरुक राहिले,
ही गोष्ट फारच कमी जणांना माहित असेल. पृथ्वी थिएटर आणि इप्टा (इंडियन पिपल्स
थिएटर असोसिएशन) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर अनेक आशयघन आणि विचारप्रवर्तक
नाटके आणली. चित्रपटामधील बटबटीतपणा, हिंसाचार, अश्लिलता याला त्यांनी या
क्षेत्रात राहुनही सातत्याने विरोध केला. धर्मनिरपेक्षता आणि मार्क्सवादी
विचारसरणीचा त्यांच्यावरील प्रभाव चित्रपटासारख्या मोहमयी दुनियेतही अखेरपर्यंत
कायम राहिला. त्यांच्या निधनाने एक विचारवंत आणि आदरणीय व्यक्तिमत्वाला आपण सारे
मुकलो आहोत, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000000000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा