शंकरराव जगताप यांच्या निधनामुळे
सच्चा गांधीवादी आणि निष्ठावंत कार्यकर्ता हरपला
-मुख्यमंत्री
मुंबई, दि. 25 : ज्येष्ठ
नेते शंकरराव जगताप यांच्या निधनाने सच्चा गांधीवादी आणि निष्ठावंत कार्यकर्ता हरपला
आहे. 1972 च्या दुष्काळात त्यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यात तयार झालेले शंभर
पाझर तलाव आजही वापरात आहेत, हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. त्यांचे कार्य एखाद्या
दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्रासाठी सतत मार्गदर्शक बनून राहिल, अशा शब्दात मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री. जगताप यांच्या निधनाबद्दल शोक
व्यक्त केलाआहे.
आपल्या
शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, अगदी विद्यार्थीदशेतच त्यांनी देशप्रेमाने प्रेरित
होऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा आणि जीवनाचा
त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. हा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर अखेरपर्यंत राहिला.
वाईच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकररावांनी काँग्रेस पक्षाची निष्ठेने
सेवा केली. कायद्याचे पदवीधर असलेल्या शंकररावांनी 1950 ते 1972 या काळात सातारा जिल्ह्यात
वकिली करुन नामांकित फौजदारी वकिल अशी ख्याती मिळविली. 1972 साली ते सातारा जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष झाले. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते सर्वसामान्यांमध्ये अतिशय
लोकप्रिय झाले. 1978 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडुन आले आणि त्यांनंतर सलग
25 वर्षे त्यांनी कोरेगावचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. या भागातील रस्ते, वीज, शिक्षण
आदी सुविधांची पायाभरणी त्यांच्याच काळात झाली. राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणुन
1980 ते 1985 आणि अध्यक्ष म्हणून 1985 ते
1990 त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. 1972च्या दुष्काळात त्यांनी केलेले काम
चिरस्थायी आहे. त्या काळात ते दिवसाचे 20 तास करीत असत. पाण्याचे आणि जलसंधारणाचे महत्व
ओळखुन त्यांनी त्यावेळी त्याचा प्रचार केला आणि 100 पाझर तलाव खोदुन घेतले. त्यांच्यासारखा
सच्चा गांधीवादी समाजसेवक आणि दूरदृष्टीचा नेता यापुढे होणे कठीण आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा