रविवार, २६ ऑगस्ट, २०१२


महाराष्ट्राला गॅस पुरवठा नियमित व्हावा : मुख्यमंत्री
नवी दिल्ली दि 26 ऑगस्ट :  दाभोळ येथील वीज निर्मिती प्रकल्पाला गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे कमाल निर्मिती क्षमतेपेक्षा कमी ऊर्जा उत्पादन होत आहे. महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी राज्याचे प्रयत्न सुरु असून यामध्ये गॅसच्या तुटवड्याचा अडथळा राहू नये यासाठी केंद्राने लक्ष घालावे, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री एस. जयपाल रेड्डी यांच्याकडे केली.
          नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील दु्ष्काळ संदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व केंद्रीय उच्चाधिकार मंत्रीगटाशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारपासून मुख्यमंत्री नवी दिल्ली येथे आहेत. त्यांनी या दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एस. जयपाल रेड्डी यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री अजीत पवार, मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत भेट घेतली.
          राज्यातील दु्ष्काळी परिस्थिती बघता धरणातील पाणी साठे कमी झाले असून पुढच्या मान्‍सूनपर्यंत ते पिण्यासाठी सरंक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील जल विद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती कमी होत आहे. याशिवाय कोळशावर आधारित  औष्णिक वीज  निर्मिती प्रकल्प राज्यात मोठ्या प्रमाणात असून कोळशाच्या पुरेशा पुरवठ्याअभावी पूर्ण क्षमतेने वीज निर्मितीस मर्यादा येत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक वायू हा एकमेव प्रर्याय पुढे आला असून दाभोळच्या वीज निर्मिती प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने राज्याच्या या मागणीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे व आवश्यक गॅसचा पुरवठा करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील वीज निर्मिती व भारनियमन संदर्भात यावेळी ऊर्जा मंत्र्यांनीदेखील केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली.     
यावेळी बोलताना एस.जयपाल रेड्डी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ व वीज टंचाई संदर्भात केंद्र शासन अतिशय गंभीर आहे. राज्याला अधिकाधिक गॅस पुरवठा कसा देता येईल, याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
00000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा