गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२


शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रदानासाठी
कोअर बँकिंग करण्याची जिल्हा बँकांना अट – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 23 : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून होते, त्या बँकांनी 31 मार्च 2013 पर्यंत कोअर बँकिंग यंत्रणा सुरु करावी. ज्या बँका अशी हमी देणार नाहीत, त्यांच्याबाबतीत पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले.
सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा बँकांमार्फत अदा केले केले जाते, ती सेवा यापुढेही कायम ठेवावी, असे मुख्यमत्र्यांनी यावेळी सुचित केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, अप्पर मुख्य सचिव जे. एस. सहारीया, सहकार सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. शिवाजी, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सदाशिवराव पोळ, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, संचालक अर्जुन खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. नलावडे, महाव्यवस्थापक डी. एफ. धरू, यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, संचालक प्रफुल्ल मानकर, वसंत घुईखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांचे वेतन देयक बँकांकडे सुपूर्द केल्यानंतर कामकाजाच्या चार दिवसांत ते वेतन शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत, तसेच ज्या बँकांकडून कोअर सर्व्हीस सेवा 31 मार्च 2013 पर्यंत सुरू होणार नाही, त्याठिकाणी पर्यायी बँकांची सेवा शोधली जाईल, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकांना दिले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा