गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२


जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के जमीन देण्याच्या
केंद्र सरकारच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

        मुंबई, दि. 23 : जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के विकसित  जमीन देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासूनची प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जहाजबांधणी मंत्री जी.के.वासन यांना दूरध्वनी करून त्यांना धन्यवाद दिले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला विनंती केली होती.
या प्रकल्पग्रस्तांना 111 हेक्टर जागा जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमार्फत सिडकोला देण्याचा तसेच या प्रकल्पग्रस्तांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला, त्यावर मुख्यमंत्री बोलत होते.
        जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या प्रकल्पग्रस्तांना भूविकास व पायाभूत सुविधा उदा.पाणी, वीज, रस्तेविकास यासाठी आवश्यक तो निधी केंद्र शासनाकडून राज्य शासनाला उपलब्ध करून देण्यात येईल.
या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे.
-----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा