बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२


प्रभाकर कुंटे हे निष्ठावंत राष्ट्रप्रेमी : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ सेनानी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार असलेले प्रभाकर कुंटे हे निष्ठावंत राष्ट्रप्रेमी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका तेजस्वी नेतृत्वाला मुकला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे
.
श्री. कुंटे यांच्या निधनाबद्दल शोकसंदेशात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, श्री. कुंटे यांचा पिंडच क्रांतिकारकाचा होता. 1942 ची चले जाव चळवळ, त्यानंतर सुरु झालेले स्वातंत्र्याचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती लढा, कामगार चळवळ यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिवशीच त्यांचे निधन झाले, हा एक योगायोगच आहे. संस्कृत, इंग्रजी आणि इतिहासाचा त्यांचा गाढा व्यासंग होता. इंडियन नॅशनल काँग्रेसचे कार्यकर्ते असलेल्या कुंटे यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावासही भोगला. 1972 मध्ये ते धारावी मतदारसंघातून विधानसभेवर निवडुन आले. श्री. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. म्हाडा, तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणुनही त्यांची कारकिर्द उल्लेखनीय ठरली. स्पष्टवक्तेपणा, लढाऊ वृत्ती आणि अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले कुंटे यांच्यासारखे नेतृत्व विरळाच. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा वाक्प्रचार ते अक्षरश: जगले. त्यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाली आहे.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा