विलासराव देशमुख व प्रभाकर कुंटे यांना मंत्रिमंडळाची
श्रद्धांजली
राज्याच्या विकास व प्रगतीत विलासरावांचे
योगदान
अतुलनीय, तर प्रभाकर कुंटे हे प्रखर
राष्ट्रप्रेमी नेते
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्राचे माजी
मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि
स्वातंत्र्यसैनिक व माजी राज्यमंत्री प्रभाकर कुंटे यांच्या
निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तीव्र दु:ख व्यक्त करुन
शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. स्व. विलासराव देशमुख यांचे राज्याच्या विकास आणि प्रगतीमधील
योगदान अतुलनीय होते, तर स्व. प्रभाकर कुंटे हे प्रखर राष्ट्रप्रेमी नेते होते,
अशा भावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची
बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
शोकप्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर दोन
मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बाभळगावचे सरपंच म्हणुन आपली राजकीय कारकिर्द सुरु केलेल्या स्व. विलासराव यांनी पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य अशी पदे भूषवित राज्यमंत्री, मंत्री, दोनवेळा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल
मारली. 1980
ते 1995 आणि 1999 ते 2009 या काळात ते राज्य विधानसभेचे सदस्य होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. 18ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003 आणि 11 नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008 या काळात असे दोनवेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी आपल्या कार्यशैलीने स्वत:ची छाप उमटविली.
विलासराव : चतुरस्त्र आणि अष्टपैलु
व्यक्तिमत्व
स्व. विलासराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र आणि अष्टपैलु होते. प्रचंड लोकसंग्रह हे त्यांचे वैशिष्ट्य होते. जनतेचे इतके अफाट प्रेम आणि लोकप्रियता मिळविणारा त्यांच्यासारखा नेता विरळाच. अमोघ वक्तृत्व आणि हजरजबाबीपणा यांची देणगी त्यांना मिळाली होती. राज्याच्या सर्व भागांतील समस्यांची जाणीव आणि अभ्यासपूर्ण माहिती त्यांना होती. या त्यांच्या गुणांचा वापर त्यांनी विविध पदे भूषविताना राज्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केला. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दात स्व. देशमुख यांच्या कार्याचा गौरव करण्यात
आला.
प्रभाकर कुंटे : लढाऊ वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमा
स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ सेनानी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आघाडीवर असलेले प्रभाकर कुंटे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका
अनुभवी नेतृत्वाला मुकला आहे. स्पष्टवक्तेपणा, लढाऊ वृत्ती आणि अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले कुंटे यांच्यासारखे नेतृत्व विरळाच.
त्यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी
झाली आहे, अशा शब्दात मंत्रिमंडळाने स्व. कुंटे यांना श्रद्धांजली वाहिली.
श्री. कुंटे यांनी 1942 ची चले जाव चळवळ, त्यानंतर सुरु झालेले स्वातंत्र्याचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती लढा, कामगार चळवळ यात सक्रिय सहभाग घेतला. संस्कृत, इंग्रजी आणि इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. कुंटे यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावासही भोगला. 1972 मध्ये ते धारावी मतदारसंघातून विधानसभेवर निवडुन आले. श्री. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. म्हाडा, तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणुनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या निधनाने राज्य एका
जाणत्या नेतृत्वाला मुकले आहे, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव मंत्रिमंडळाने
केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा