प्रभाकर कुंटे यांच्या
निधनाने एका युगाचा अंत -
मुख्यमंत्री
मुंबई, दि.16 : जुन्या पिढीतील एक दिग्गज
विचारवंत, राजकीय स्थित्यंतरामध्ये कायम आघाडीवर असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य
सेनानी, माजी राज्यमंत्री प्रभाकर कुंटे यांच्या निधनामुळे आज एका युगाचा अंत झाला
आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त
केल्या.
प्रभाकर कुंटे यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त
केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार भालचंद्र मुणगेकर,
लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ,
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, महिला व
बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, आदिवासी विकास
मंत्री बबनराव पाचपुते, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील
मान्यवर तसेच विविध
पक्षांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व चळवळीचा अनुभव असलेल्या
प्रभाकर कुंटे यांनी आपल्या कृतीशील नेतृत्वातून जनसामान्यांचे विविध प्रश्न
मार्गी लावले होते. विशेषत: तळागाळातील
जनतेबद्दल त्यांना विशेष आस्था होती,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, झोपडपट्टीवासियांना फोटोपास देऊन त्यांच्या घराचा, जागेचा प्रश्न
सोडवण्याचे उल्लेखनीय कार्य कुंटे यांनी केले आहे.
साधी राहणी उच्च विचार सरणी या उक्तीचे
चालतेबोलते उदाहरण असलेल्या प्रभाकर कुंटे यांनी कुशल संघटक म्हणून आपल्या
कार्यातून नव्या पिढीला दिशादर्शक ठरणारी कारकीर्द निर्माण केली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी प्रभाकर कुंटे यांचे अंत्यदर्शन
घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा