बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२


पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनीया गांधी यांच्यासह मान्यवरांची
कै. विलासराव देशमुख यांना श्रध्दांजली

लातूर, दि. 15- दिवंगत केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, श्रीमती सोनीया गांधी, राज्यपाल के. शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी आज दुपारी येथे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
कै. विलासराव देशमुख यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बाभळगाव येथील दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि श्रीमती सोनीया गांधी यांचे दुपारी पावणेदोनच्या सुमारास तेथे आगमन झाले. त्यांनी कै. विलासराव देशमुख यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि श्रीमती वैशालीताई देशमुख, आ. दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख, रितेश देशमुख, धिरज देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर राज्यपाल के. शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन देशमुख परिवाराचे सांत्वन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री राजीव शुक्ला, श्री. माणिकराव ठाकरे, श्री. मोहन प्रकाश आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी आज सकाळी 8-30 वाजता कै. विलासराव देशमुख यांचे पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने लातूर विमानतळावर आणण्यात आले. तेथून ते बाभळगाव येथे नेण्यात आले. लातूर विमानतळ ते बाभळगाव या मार्गावर दुतर्फा शेकडो स्त्री-पुरुष उभे होते. त्यांनी साश्रु नयनांनी आपल्या नेत्याला श्रध्दांजली अर्पण केली. लातूर विमानतळ ते बाभळगाव या सुमारे 20 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी तब्बल अडीच तासाचा कालावधी लागला. विमानतळावर पालकमंत्री सतेज पाटील, खा. जयवंतराव आवाळे, आ. वैजनाथ शिंदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्त्री-पुरुष उपस्थित होते.
कै. विलासराव देशमुख यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बाभळगाव येथे शेकडो लोकांनी गर्दी केली. बाभळगाव परिसरात मिळेल त्या जागेवर लोक उभे होते. अंत्यदर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून तसेच अन्य राज्यातूनही लोक आले होते.
आज दुपारी दोन पर्यंत विविध मान्यवरांनी कै. देशमुख यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोकराव चव्हाण, लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
                                ---000---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा