देशाची
अर्थव्यवस्था बळकट करण्यात
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान
महत्वपूर्ण
--
पंतप्रधान
मुंबई,
दि. 18 : देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र महत्वाची
भूमिका बजावत आहे. या क्षेत्रात युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान
डॉ.मनमोहन सिंग यांनी आज येथे केले.
भारतीय औद्योगिक संस्थान, मुंबईच्या (आय.आय.टी.) पदवी प्रदान
समारंभ पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी
स्नातकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या समारंभास राज्यपाल के.
शंकरनारायणन, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल, मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण, डॉ.अनिल काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आय.आय.टी., मुंबई हे संशोधन क्षेत्रात प्राधान्याने कार्य करीत
असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. विकसनशील देशांसोबत स्पर्धा
करण्यासाठी आपणास संशोधन व विकास क्षेत्रात अधिक व्यापक काम करायला पाहिजे, असे सांगून
पंतप्रधान पुढे म्हणाले, भारताला लाखो अभियंते व कुशल कामगारांची गरज आहे. सर विश्वेश्वरय्या,
के.एल.राव या ज्येष्ठ अभियंत्यांनी भारतीय अभियांत्रिकी व विज्ञान क्षेत्रात
मोलाचे योगदान दिले आहे.
आय.आय.टी.च्या माजी विद्यार्थ्यांनी देशात व परदेशात विविध
क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून भारताला जागतिक स्तरावर नेले आहे. आज
पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वातून निश्चितच
स्फूर्ती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान डॉ. सिंग यांनी व्यक्त केला.
मनुष्यबळ विकास संसाधन मंत्री कपिल सिब्बल यांनी या ऐतिहासिक समारंभास उपस्थित राहता आले, हा
माझा सन्मान आहे असे सांगून आय.आय.टी.चे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम
काम करीत आहेत. आज पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील आयुष्यात हे शिक्षण
निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदवी घेऊन नव्या व्यावसायिक
जगात प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आय.आय.टी.मध्ये यावर्षी
100 पैकी 78 जे.ई.ई. प्राविण्यधारकांनी प्रवेश घेतला ही बाब महत्वपूर्ण असल्याचे
त्यांनी सांगितले. अजिम प्रेमजी यांनी शिक्षण कधीच थांबवू नका असा मौलिक सल्ला
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला. आयआयटीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून
यावर्षी 2006 विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभात पदवी देण्यात आली.
याप्रसंगी विप्रोचे अजिम प्रेमजी यांना डॉक्टर ऑफ सायन्स या
मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती पदक
विजेता उदय प्रितेश कामत, संस्थेचे सुवर्ण पदक विजेता यशोवर्धन चाटी, डॉ.शंकर दयाळ
शर्मा सुवर्ण पदक विजेता जॉन जॉय यांना पदवी व सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. या
समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा