गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२


यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
आत्माराम भेंडे यांना जाहीर
मुंबई, दि. 30 ऑगस्ट ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री. आत्माराम भेंडे यांना यावर्षीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री, संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवडीसंदर्भात झालेल्या बैठकीत श्री. आत्माराम भेंडे यांची निवड करण्यात आली.
        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी श्री. आत्माराम भेंडे यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच दिमाखदार समारंभात करण्यात येईल.
        महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या या रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराचे रोख रुपये 5 लक्ष, मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरुप आहे.
        गेली सहा दशकांहून अधिककाळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता  म्हणून कार्यरत असणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटर मधून आपली कारकीर्द सुरु केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटकं दर्शकांना दिली. बबन प्रभू-आत्माराम भेंडे या जोडीने दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्न आदी अनेक नाटके गाजविली. अभिनेता म्हणून भेंडे साहेबांनी मन पाखरु पाखरु, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांतून आपले अभिनय कौशल्य दाखविले.
        मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी कर्तृत्व गाजविले. तसेच दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.
        त्यांना आतापर्यंत नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक तसेच 2006-07 साली महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
        व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण नाट्यमुद्रा उमटविणारे ज्येष्ठ रंगकर्मी कै. प्रभाकर पणशीकर यांना 2006 मध्ये पहिल्या पुरस्काराने गौरविण्यात आले तर आतापर्यंत श्रीमती विजया मेहता (2007), श्री. भालचंद्र पेंढारकर (2008), श्री. मधुकर तोरडमल (2009), श्रीमती सुलभा देशपांडे (2010) आणि श्रीमती सुधा करमरकर (2011) यांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा