मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२


राजकारणातील दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले
मुंबई दि. 14 ऑगस्ट : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि माजी  मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने एक मित्र आपल्यातून निघून गेला अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की,  गेल्या काही महिन्यांपासून विलासरावांची प्रकृती बरी नव्हती. लिव्हरच्या दुखण्यावरील उपचार त्यांच्यावर सुरु होते. त्यांच्या तब्येतीकडे सर्वांचेच लक्ष होते. मुळात विलासरावांना कोणी कधी आजारी असलेले पाहिले नाही.  प्रसंग कुठलाही असो, विलासराव अतिशय हसतमुखाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात होते. केवळ स्वपक्षातच नव्हे तर विरोधी पक्षांमध्ये देखील विलासरावांची  लोकप्रियता होती. आणि त्यामुळेच ते आजारी आहेत या बातमीने सर्वांमध्ये अस्वस्थता होती. आज दुपारी 1.40 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी कळाली तेव्हा आम्हा सर्वांनाच धक्का बसला. गेल्या आठवडयात मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चेन्नईला गेलो होतो. डॉक्टरांशी माझी चर्चाही झाली होती. लिव्हर ट्रान्सप्लांटचे डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी होतील अशी आम्हा सगळ्यांना आशा होती. मात्र दुदैवाने हे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले आणि विलासराव आमच्यातून निघून गेले असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, मी अनेक वर्षापासून विलासरावांना जवळून ओळखतो. त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर पक्षाचीविविध पदे भूषवित ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात पोहचले. सुरुवातील राज्यमंत्री आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. सरपंचापासून मुख्यमंत्री पदापर्यंतची त्यांची ही झेप सर्वांना चकीत करणारी होती. ही पदे त्यांना केवळ नशीबाने मिळाली नाहीत तर एक मॅच्युअर्ड राजकीय व्यक्तीमत्वाचा हा सगळा प्रवास होता. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात विशेषत: राज्याने औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वाची वाटचाल केली. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा त्यांचा संकल्प होता, त्यावेळी मी केंद्रात होतो आणि मुंबई तसेच महाराष्ट्रामधील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात माझी त्यांच्याशी वारंवार चर्चाही होत असे.
विलासरावांचे व्यक्तिमत्व केवळ उमदे नव्हते तर प्रगतीशील आणि विकासाभिमुख राजकारणी अशी त्यांची देशभर ओळख होती. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील एक धडाडीचा नेता आम्ही अकाली गमावला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझ्या त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा