रविवार, १२ ऑगस्ट, २०१२



केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार : घटनेची सखोल चौकशी सुरु
पोलिस आणि प्रसारमाध्यमांवर झालेला हल्ला
हा शासन यंत्रणेच्या अधिकारितेवरील हल्ला : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 12 : मुंबईतील आझाद मैदान आणि सीएसटी परिसरात काल निदर्शकांकडुन पोलिस आणि प्रसारमाध्यमांवर झालेला हल्ला हा शासन यंत्रणेच्या अधिकारितेवर झालेला हल्ला असून सरकार याकडे अतिशय गांभिर्याने पहात आहे. कालचा प्रकार पूर्वनियोजित असावा का, याबाबत गुन्हे शाखेच्यावतीने सखोल चौकशी सुरु असून गोळीबाराच्या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, माध्यमे यांच्याकडुन सहकार्याची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले.
कालच्या घटनेसंदर्भात टीव्ही जर्नालिस्टस्‍ असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आणि भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. टीव्ही जर्नालिस्टस्‍ असोसिएशनचे शिष्टमंडळ संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सांडभोर व सरचिटणीस प्रसाद काथे यांच्या नेतृत्वाखाली भेटले. भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली भेटले.

माध्यमांवरील हल्ला निषेधार्ह
        टीव्ही जर्नालिस्टस्‍ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कालच्या घटनेबाबत श्री. चव्हाण यांना सविस्तर माहिती दिली. या चर्चेत सर्वश्री शशिकांत सांडभोर, प्रसाद काथे, आशिष जाधव, रवि अंबेकर, साहिल जोशी, विनोद जगदाळे, अभिषेक शर्मा, मेघा प्रसाद, स्मिता नायर, अमित जोशी आदींनी भाग घेतला.
निदर्शकांनी यावेळी प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले, ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अशा घटनांप्रसंगी तिचे वृत्तसंकलन करण्यासाठी आलेले पत्रकार आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांच्यासंदर्भात काही निश्चित संहिता किंवा नियमावली असावी, अशा प्रसंगी पोलिसांमार्फत वारंवार अधिकृत माहिती दिली जावी, घटनेच्या ठिकाणी वृत्तसंकलन करणारे प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि त्यांची साधनसामग्री यांच्य सुरक्षेबाबत निश्चित धोरण ठरवावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कालच्या घटनेत ज्या वाहिन्यांच्या ओ.बी. व्हॅन जाळण्यात आल्या, त्यांची नुकसान भरपाई मिळावी, अशीही मागणी करण्यात आली.
        प्रसारमाध्यमांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध श्री. चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, माध्यमांवरील हल्ल्याचा प्रकार पूर्वनियोजित होता का याबाबत चौकशी करण्यात येत आहे. पत्रकारांना अशा घटनांवेळी संरक्षण देणे, घटनेबाबत अधिकृत माहिती देणे याविषयी गृह विभाग, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्य सचिव कार्यालय, आणि माहिती जनसंपर्क विभाग यांच्याकडुन शिफारशी मागविल्या जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव प्रमोद नलावडे उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार
        कालच्या घटनेसंदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेणार आहे. या घटनेची सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. चौकशी अत्यंत निष्पक्षपाती पद्धतीने आणि गांभिर्याने केली जाईल व दोषी व्यक्तींना कडक शासन केले जाईल, असे श्री. चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला सांगितले.
        शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री श्री. राम नाईक,  आमदार सरदार तारासिंह, गिरीश महाजन, श्री. मधु चव्हाण, श्री. राज पुरोहित, श्री. आशिष शेलार यांचा समावेश होता.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा