सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२


मंत्रालय लोकशाही दिनी 5 अर्जांवर सुनावणी
          मुंबई, दि. 6 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अपंगांना स्टॉलसाठी जागा देण्याचा निर्णय होईल त्यावेळी अर्जाची सोडत काढून जागा वाटप करावी, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिले.
          महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. आज आयोजित केलेल्या लोकशाही दिनी आलेल्या अर्जावर सुनावणी करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस. मीना, अतिरिक्त पोलीस महासंचालक अहमद जावेद, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे सचिव एस.संधू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
       ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अपंगासाठी स्टॉलसाठी जागा मिळावी यासाठी आलेल्या अर्जाच्या सुनावणी वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नवीन स्टॉल न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. परंतु ज्यावेळी स्टॉल देण्याचा निर्णय होईल त्यावेळी प्राप्त अर्जामधून सोडत काढून त्याचे वाटप करावे.
       आजच्या लोकशाही दिनी एकूण सहा अर्जदाराचे अर्ज विचारात घेण्यात आले होते.   या पैकी पाच अर्जदार उपस्थित होते. यामध्ये नगर विकास विभागांसंबधी दोन प्रकरणे होती. गृह विभागासंबंधी एक, महसूल विभागासंबंधी एक तर ग्रामविकास विभागासंबंधी एक प्रकरण होते. सर्व प्रकरणांची सखोल माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी अर्जदारांची बाजू समजून घेतली व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा