शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२


हेरिटेज यादीसंदर्भात मनपा आयुक्त आणि हेरिटेज समितीचे
मत मागवुन पुढील निर्णय घेणार : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 31 : मुंबईतील हेरिटेज वास्तू परिसरासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचनेत समाविष्ट असलेल्या वास्तुंबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि हेरिटेज समितीचे मत मागवून याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
मुंबईतील हेरिटेज वास्तू परिसरासंदर्भात राज्य सरकारने अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महापौर सुनील प्रभू, आमदार सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रविंद्र वायकर आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाशी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, मुंबई शहरात अनेक वास्तू आणि परिसर ऐतिहासिक महत्वाचे आहेत. विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा ऐतिहासिकपणा हरवु नये, त्यांचे संरक्षण व्हावे आणि हेरिटेजची परंपरा नष्ट होऊ नये, एवढाच उद्देश यामागे आहे. यादृष्टीने ही समिती खूप महत्वाची आहे. यामुळेच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने सुचविलेल्या वास्तू परिसरासंदर्भात लोकभावना मी समजू शकतो. मात्र, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि हेरिटेज समितीचे लेखी मत मागविण्यात येईल. त्यांनतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
समितीने जी यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये अनेक राहत्या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती, पुनर्बांधणी यामध्ये अडचणी येईल, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यासाठी या यादीचा फेरविचार व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
0000

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२



विशेष बक्षीस देऊन 26/11 हल्ल्याच्या
तपासी अधिकाऱ्यांना गौरविणार
                                                         - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 30 : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील तपासी यंत्रणा सक्षम असल्याचे सिध्द झाले आहे.  या हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांना बक्षिसाने गौरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीरा चव्हाण यांनी आज केली.
राज्य पोलीस महासंचालकाच्या कार्यालयात आयोजित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव जयंत कुमार बांठीया, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
        आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करुन तो वाढविण्यासंबंधी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. रस्ता रोको, रेल रोको, मोर्चा, निदर्शने यासारख्या आंदोलनामागे सवंग लोकप्रियता मिळविण्याचा काही घटकांचा हेतू असतो. अशी आंदोलने हाताळताना सुसंवादाची आवश्यकता असते.  पोलीस यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा, प्रशिक्षण आदींची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जिल्हानिहाय सुसंवाद साधण्यासाठी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. आधुनिक डी. एन. ए. तंत्रज्ञान व फॉरेन्सिक लॅबचा दर्जा वाढविण्याबाबत प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.  तसेच पोलीस दलातील हुतात्मा झालेल्यांच्या मुलांना नोकरीत वेगळी टक्केवारी देऊन आरक्षण ठेवण्याबाबतही विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.
पूर्वी पोलिसांचा असणारा दरारा आता कमी होत चालला असून  याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  पोलीस तपासाला गती देण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला 25 हजार रुपये इन्व्हेंस्टीगेशन फंड देण्याची तरतूद लवकरच करण्यात येईल पोलीस दलातील 1000 वाहने बदलण्यासाठी निधी देण्याची तयारीही त्यांनी यावेळी दर्शविली. नक्षलवादी कारवायांबाबत आता जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. गट, तट, राजकारण याला थारा न देता संघभावनेला प्राधान्य देऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.                          गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले की महाराष्ट्र पोलीस दल एक कुटुंब ही भावना रुजविण्याची सध्याच्या काळात आवश्यकता आहे. आज लोकांना 100 टक्के सुरक्षेची हमी पाहिजे असून यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कौशल्याने वापर करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचा प्रयत्न केला पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना सन्मानाने वागवावे,  लोकप्रतिनिधिंशी चांगले संबंध ठेववेत.  पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक द्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.  तसेच धाडसाने जनहितासाठी निर्णय घेणाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असून यापुढे तपासात त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळ हा सणासुदीचा काळ असून गणेशोत्सव, नवरात्रौत्सव या दरम्यान सतर्क राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पोलीस शिपायांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यांच्या घरासंबंधीचा प्रश्न, प्रत्येक शहरात सी. सी. टी.व्ही., बॉम्बे पोलीस ॲक्टमधील जुन्या तरतुदी बदलण्याची गरज असून सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
0 0 0 0






पर्यटक सुविधेसाठी मुंबईत
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल उभारणार
                                    - मुख्यमंत्री

        मुंबई, दि. 30 : देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबई हजारो पर्यटक दरवर्षी भेट घेतात. त्यामुळे मुंबईत पर्यटकांच्या सुविधेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. इंडियन असोसिएशन ऑफ टुर ऑपरेटर्सच्या 28 व्या वार्षिक संमेलनात ते उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.
        सीपीएच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पर्यटन तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री रणजित कांबळे, बिहारचे पर्यटन राज्यमंत्री सुनीलकुमार पिंटो, पश्चिम बंगालचे पर्यटन राज्यमंत्री रजपाल सिंह, असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष गोयल, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदिश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
        मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले, मुंबई हे बॉलिवूड क्षेत्रातही महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या विशेषत: ऑस्ट्रेलिया, थायलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई आदी देशातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात लक्झरी क्रुझने पर्यटक येतात. मात्र त्यांना मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल नसल्याने त्यांना योग्य सुविधा  उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी सोयीसाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ उभारले जाईल त्याची पर्यटन विकासास निश्चितच मदत होईल. महाराष्ट्र राज्य देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. मेक्सीको देशाएवढे हे राज्य आहे. मोठे राज्य असल्यामुळे येथील बाजारपेठे देखील मोठे आहे त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्या मिळविण्यासाठी आपण पुढे यावे. महाराष्ट्र शासन त्यासाठी एक पाऊल पुढे टाकेल. तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध परवानग्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली जाईल कारण पर्यटनक्षेत्र हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.2006 च्या पर्यटन धोणाचा आढावा घेऊन त्यातील घोषणांनुसार पर्यटन विकासाची कामे केली जातील, असेही ते म्हणाले.
        जगामध्ये असलेली सर्व प्रकारची पर्यटन स्थळे भारतामध्ये असून त्यातील बहतांश पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात हिमालय पर्वत सोडला तर सर्वकाही आहे अशा शब्दात पर्यटन तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन संपत्तीची महती सांगितली. तसेच महाराष्ट्रात अंतर्गत पर्यटन स्थळांच्या प्रवासासाठी सर्वत्र चौपदरी रस्ता झाला हे महत्त्वाचे काम झाले आहे. राज्यातील 800 घरांमध्ये पर्यटकांसाठी निवास, न्याहरी व्यवस्था असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे विमानतळ व हेलीपॅड देखील उपलब्ध असून पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा. या असोसिएशनने एकत्र येऊन संवाद साधावा व त्याद्वारे जगातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
        पर्यटन राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत करुन महाराष्ट्राच्या विविध पर्यटन योजनांची माहिती दिली. तसेच बिहारचे पर्यटन राज्य मंत्री श्री. पिंटो व पश्चिम बंगालचे पर्यटन राज्यमंत्री श्री. सिंह यांनी देखील आपापल्या प्रांतातील पर्यटन विषयी माहिती सांगितली.  तसेच मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनीही सर्वांचे स्वागत करुन पर्यटन विकासासाठी शासन करीत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
        आपल्या प्रास्ताविकातून संघटनेचे अध्यक्ष सुभाष गोयल यांनी पर्यटन विकासासाठी महाराष्ट्राकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या व महाराष्ट्राचे आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असोसिएशनचे विविध पुरस्कार देण्यात आले व पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या संमेलनाचे सहआयोजक हे महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असून संमेलन 2 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
0 0 0 0


राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
जेष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना जाहिर
मुंबई, दि. 30 : राज्य शासनाचा 2012-13 गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री, मा.ना.श्री. संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय समितीने नुकताच हा पुरस्कार घोषित केला. रु.5 लाख, मानचिन्ह, मानपत्र, श्रीफळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी श्री. आनंदजी शहा यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच दिमाखदार समारंभात करण्यात येईल.
           आनंदजी शहा यांचा जन्म कुंदरोली, कच्छ (गुजरात) या ठिकाणी दिनांक 2 मार्च 1933 साली झाला.  त्यांचे वडील हे कच्छचे व्यापारी होते. त्यांनी व्यवसायानिमित्त मुंबईत किराणा मालाचे दुकान सुरु केले.  मुंबईतील गिरगाव या ठिकाणी अनेक वर्ष संगीत श्रवणात रमले. दुसऱ्यास आकर्षित करण्यासाठी सहज असलेले गुण लक्षात घेता ते अल्प काळात प्रसिध्दीस पावले.
           भारतीय संगीतात प्रसिध्द रचनाकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत विविध गीतांना संगीतमय करुन गीते अजरामर केली. सन 1970 या साली दोन गुजराती बांधवांची जोडी एकत्रित एकाच रंगमंचावर संगीतासाठी काम करु लागली.  त्यांच्या सोबत असलेली व्यक्ती  म्हणजे कल्याणजी.
           त्यांनी त्यांच्या हयातीत डॉन, बेरंग, सरस्वतीचंद्र, कुरबानी आणि सफर या अजरामर चित्रपटांना संगीतस्वर देऊन हिंदी चित्रपटांना पुरस्कार मिळवून दिले.  कोराकागज या चित्रपटास संगीताचे उत्तम संगीत दिग्दर्शन दिल्याबद्दल त्यांना सन 1975 चा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.
           त्यांना सन 1965 साली हिमालय की गोदमें या चित्रपटास संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार, सरस्वतीचंद्र या चित्रपटास उत्तम संगीतासाठी सन 1968 मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार, एच.एम.व्ही. या कंपनीने त्यांना सन 1978 साली मुक्कदर का सिंक्कदर या चित्रपटासाठी पहिली प्लॅटिनियम डिस्क प्रदान केली. पॉलिडोर या कंपनीने  कुरबानी या चित्रपटासाठी सन 1980 मध्ये पहिली प्लॅटिनियम डिस्क प्रदान केली. हिंदी चित्रपटांस योगदान दिल्याबद्दल 1992 चा इम्पा या पुरस्कारांने गौरविण्यात आले. सहारा परिवारातर्फे यु.के. येथे सन 2004 साली जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या आनंद विरजी शहा यांची कारकिर्द त्यामुळे उंचावत गेली.
           ज्येष्ठ संगीतकार खय्याम, अशोक पत्की, कवी ना.धो. महानोर आणि आशुतोष घोरपडे संचालक, सांस्कृतिक कार्य यांच्या निवड समितीने आनंदजी शहा यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अनुभव लक्षात घेता त्यांच्या नांवाची पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यानंतर मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य, मा. राज्यमंत्री सांस्कृतिक कार्य, मा. अप्पर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य संचालक, सांस्कृतिक कार्य यांच्या निर्णय समितीने आनंदजी शहा यांना हा पुरस्कार देण्याबद्दलचा निर्णय एकमताने घेतला. संगीत, गायन क्षेत्रात मोलाचे काम केलेल्या व्यक्तींना 1992 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात येतो. या आधीही सुमन कल्याणपुरकर, संगीतकार खय्याम, सुलोचना चव्हाण इत्यादी मान्यवरांना या पुरस्कारांने शासनाकडुन सन्मानित करण्यात आले आहे.
0000000