हेरिटेज यादीसंदर्भात मनपा आयुक्त आणि हेरिटेज समितीचे
मत मागवुन पुढील निर्णय घेणार : मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 31 :
मुंबईतील हेरिटेज वास्तू व परिसरासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचनेत समाविष्ट असलेल्या वास्तुंबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि हेरिटेज समितीचे मत मागवून याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
मुंबईतील हेरिटेज वास्तू व परिसरासंदर्भात राज्य सरकारने अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महापौर सुनील प्रभू, आमदार सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रविंद्र वायकर आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाशी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की,
मुंबई शहरात अनेक वास्तू आणि परिसर ऐतिहासिक महत्वाचे आहेत. विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा ऐतिहासिकपणा हरवु नये, त्यांचे संरक्षण व्हावे आणि हेरिटेजची परंपरा नष्ट होऊ नये, एवढाच उद्देश यामागे आहे. यादृष्टीने ही समिती खूप महत्वाची आहे. यामुळेच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने सुचविलेल्या वास्तू व परिसरासंदर्भात लोकभावना मी समजू शकतो. मात्र, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि हेरिटेज समितीचे लेखी मत मागविण्यात येईल. त्यांनतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
समितीने जी यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये अनेक राहत्या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती, पुनर्बांधणी यामध्ये अडचणी येईल, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यासाठी या यादीचा फेरविचार व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा