विशेष बक्षीस देऊन 26/11
हल्ल्याच्या
तपासी अधिकाऱ्यांना गौरविणार
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 30 : मुंबईवरील 26/11 च्या
दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर
सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील तपासी यंत्रणा सक्षम
असल्याचे सिध्द झाले आहे. या हल्ल्याचा
तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांना बक्षिसाने गौरविण्यात येईल, अशी घोषणा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
राज्य पोलीस महासंचालकाच्या कार्यालयात
आयोजित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेस उपमुख्यमंत्री
अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज
पाटील, मुख्य सचिव जयंत कुमार बांठीया, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणाबाबत
चिंता व्यक्त करुन तो वाढविण्यासंबंधी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. चव्हाण
म्हणाले. रस्ता रोको, रेल रोको, मोर्चा, निदर्शने यासारख्या आंदोलनामागे सवंग
लोकप्रियता मिळविण्याचा काही घटकांचा हेतू असतो. अशी आंदोलने हाताळताना सुसंवादाची
आवश्यकता असते. पोलीस यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा,
प्रशिक्षण आदींची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जिल्हानिहाय सुसंवाद साधण्यासाठी
व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. आधुनिक डी. एन. ए. तंत्रज्ञान व फॉरेन्सिक लॅबचा दर्जा वाढविण्याबाबत प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीची मर्यादा 12 लाखांपर्यंत
वाढविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
तसेच पोलीस दलातील हुतात्मा झालेल्यांच्या
मुलांना नोकरीत वेगळी टक्केवारी देऊन आरक्षण ठेवण्याबाबतही विचार करण्यात येईल
असेही ते म्हणाले.
पूर्वी पोलिसांचा असणारा दरारा आता कमी होत चालला असून याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पोलीस तपासाला गती देण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला 25 हजार रुपये इन्व्हेंस्टीगेशन फंड देण्याची तरतूद लवकरच
करण्यात येईल पोलीस दलातील 1000 वाहने बदलण्यासाठी
निधी देण्याची तयारीही त्यांनी यावेळी दर्शविली. नक्षलवादी कारवायांबाबत आता जशास
तसे उत्तर देण्याची गरज आहे. गट, तट, राजकारण याला थारा न देता संघभावनेला प्राधान्य
देऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले की महाराष्ट्र पोलीस दल एक कुटुंब ही भावना रुजविण्याची सध्याच्या काळात आवश्यकता आहे. आज
लोकांना 100 टक्के सुरक्षेची हमी पाहिजे असून यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कौशल्याने
वापर करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचा प्रयत्न केला
पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना सन्मानाने वागवावे, लोकप्रतिनिधिंशी चांगले संबंध ठेववेत. पोलीस
स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक द्यावी
अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच धाडसाने जनहितासाठी निर्णय घेणाऱ्यांच्या
पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असून यापुढे तपासात त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्याला
कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळ हा सणासुदीचा काळ असून गणेशोत्सव, नवरात्रौत्सव या दरम्यान सतर्क
राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे
आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पोलीस शिपायांचे मनोधैर्य
वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी
सांगितले. त्यांच्या घरासंबंधीचा प्रश्न, प्रत्येक शहरात सी. सी. टी.व्ही., बॉम्बे
पोलीस ॲक्टमधील जुन्या तरतुदी बदलण्याची गरज असून सामाजिक
सलोखा टिकविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया,
गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा