श्री. मुखर्जी यांच्या रुपाने
सर्वार्थाने सक्षम व्यक्ती
राष्ट्रपती पदावर विराजमान :
मुख्यमंत्री
मुंबई, दि.
22 : संसदेच्या दोन्ही सभागृहांचा प्रदीर्घ अनुभव, विविध मंत्रिपदांचा अत्यंत
कार्यक्षमपणे केलेला कारभार, कामाचा प्रचंड उरक, निर्णयक्षमता, घटनात्मक तरतुदींचा
सखोल अभ्यास असलेले आणि भारतीय राजकारणाचा चालताबोलता ज्ञानकोश म्हणुन ओळखले
जाणारे श्री. प्रणव मुखर्जी यांची देशाचे
तेरावे राष्ट्रपती झालेली निवड सर्वार्थाने योग्य आहे. त्यांच्या या यशाबद्दल मी
त्यांचे तमाम महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
देशाचे
तेरावे राष्ट्रपती म्हणुन निवड झालेले श्री. प्रणव मुखर्जी यांचे श्री. चव्हाण
यांनी दूरध्वनीवरुन हार्दिक अभिनंदन केले. श्री. मुखर्जी यांना शुभेच्छा देताना
श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, श्री मुखर्जी यांच्या रुपाने एक अत्यंत सक्षम
व्यक्ति राष्ट्रपतीपदावर विराजमान झाली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार
म्हणुन त्यांनी मिळविलेले निर्णायक यश अभिमानास्पद आहे. श्री. मुखर्जी यांची
कारकिर्द अत्यंत उज्ज्वल आणि राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा वाढविणारी ठरेल, याची
मला खात्री आहे. त्यांच्या कारकिर्दीला मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने
शुभेच्छा देतो.
श्री मुखर्जी हे त्यांच्या राजकीय वर्तुळात आणि
मित्रपरिवारामध्ये प्रणवदा म्हणुन ओळखले जातात. अत्यंत साधेपणा, कामाप्रती असलेली
आत्यंतिक निष्ठा, पक्षकार्यासाठी झोकुन काम करण्याची मनोवृत्ती आणि सर्वसामान्य
माणसाच्या कल्याणाबद्दलची कळकळ ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये आहेत. या गुणांमुळेच
ते आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले
आहे.
श्री. चव्हाण म्हणाले की, श्री. मुखर्जी यांच्यासमवेत केंद्रीय
मंत्रिमंडळात त्यांचा सहकारी म्हणुन काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याशी
असलेल्या संबंधाचा फायदा महाराष्ट्राला नक्कीच होईल, याची मला खात्री आहे. महासचिव म्हणुन पक्षकार्य, संसदेच्या दोन्ही
सभागृहाचे आणि विविध महत्वाची मंत्रीपदे यांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. व्यापार
मंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून अनेक महत्वांच्या
खात्यांचा कारभार त्यांनी अत्यंत सक्षमपणे चालविला. अर्थमंत्री आणि योजना आयोगाचे उपाध्यक्ष या
नात्याने त्यांना देशातील प्रत्येक राज्याच्या समस्यांचा चांगलाच परिचय आहे. केंद्रीय मंत्री मंडळातील पेचप्रसंग सोडविण्यात
आणि मतभिन्नता असलेल्या विषयामध्ये मार्ग काढण्याकरीता त्यांनी अनेकदा महत्वाची
भूमीका बजावली. शक्तीप्रदान मंत्रीगटाचे अध्यक्ष म्हणून युपीए 1 आणि युपीए 2 चे आधारस्तंभ म्हणून
ते ओळखले जातात.
राष्ट्रपतीपद
या देशाच्या सर्वोच्च पदावर काम करताना
त्यांना या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. अत्यंत उच्च वर्तुळात आणि उच्च पदांवर काम
करुनही सर्वसामान्य राहणी आणि सामान्य माणसाबद्दलचा कळवळा ही त्यांची
स्वभाववैशिष्ट्ये असल्यामुळे देशातील प्रत्येक माणूस त्यांच्या निवडीमुळे आनंदी
झालेला आहे. या सर्वांच्या आनंदात मीही सहभागी आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले
आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा