हिंदी
सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या
पहिल्या सुपरस्टारला मुकलो
- मुख्यमंत्री
मुंबई, दि.18 जुलै : राजेश खन्ना यांच्या निधनाने हिंदी
सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या पहिल्या सुपरस्टारला मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने अभिनयाच्या माध्यमातून तरल
भूमिकांचे एक पर्व संपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात पुढे म्हणतात की, “राजेश खन्ना यांनी कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या
हृदयावर राज्य केले. 1992 मध्ये पोटनिवडणुकीतून नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून
ते लोकसभेवर निवडून गेले. आपल्या या राजकीय कारकिर्दीत त्यांनी एकही नवीन चित्रपट
स्वीकारला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. माझ्या कराड लोकसभा मतदारसंघात माझ्या प्रचार
मोहिमेसाठी ते दोनवेळा आले होते. 1992 ते 96
या कालावधीत लोकसभेत सहकारी म्हणून आम्ही एकत्र होतो. 180 हून अधिक चित्रपटात
भूमिका केलेल्या खन्ना यांनी बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार हे सर्वोच्च स्थान
मिळविले. 106 चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका अदा केली. हळव्या आणि संवेदनशील
नायकाच्या हळुवार भूमिकांसाठी ते नेहमी ओळखले गेले. अत्यंत संयमीत अभिनय आणि संवादांची हळुवार फेक
ही त्यांची खासीयत होती. संपूर्ण
कुटुंबांचे मनोरंजन करणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या. प्रत्येक भूमिकेवर त्यांचा स्वत:चा ठसा असायचा.
अतिशय कमी कालावधीत सुपरस्टारपद मिळविलेल्या खन्ना यांना पुढील काळात ते पद
टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागला, आणि त्याला ते सामोरे गेले.
1967 ते 2010 अशी प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या राजेश
खन्ना यांचे आराधना, सच्चा झुटा, आनंद, कटी पतंग, अंदाज, बावर्ची, हाथी मेरे साथी,
आपकी कसम असे एकाहून एक सरस चित्रपट रसिकांच्या कायम स्मरणात रहाणारे आहेत. आनंद चित्रपटातील “बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही” हा संवाद ते अक्षरश: जगले. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला
गेलेल्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी 14 वेळा त्यांचे नामांकन झाले. आणि 3 वेळा
सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला.” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा