राज्याच्या आर्थिक विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
शिर्डी दि.7- महाराष्ट्रात सहकार चळवळ यशस्वीपणे राबविल्यामुळे राज्यभर सहकाराचे मोठे जाळे पसरले आहे. राज्याच्या आर्थिक विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था परिषदेच्या निमित्ताने आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील थायलंड येथील असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ACCU) चे अध्यक्ष चॅलेरम्पॉल व इतर आठ देशातील सहकारी प्रतिनिधी आले होते. त्यांच्यावतीने मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांचा हॉटेल सेंट लॉरेन येथे सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील परदेशी पाहुण्यांशी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री बबनराव पाचपुते, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसुल राज्यमंत्री प्रकाश दादा सोळंके, संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, जिल्हाधिकारी संजीवकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सहकारामुळे मोठी भरभराट झाली आहे. राज्य शासनाच्यावतीने सहकार विभागातील उद्योजकांना तसेच सहकार व पतसंस्थांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येतात. महाराष्ट्र हे देशातील मोठे व विकसनशिल राज्य आहे. संघटित बँकींग व्यवस्था येथे आहे. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येतात. राज्यात सहकाराचा जुना कायदा आहे. अस्तित्वात असलेल्या कायद्यातील त्रुटी दूर करुन सहकार कायद्यात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सेासायटीचे कार्यकारी संचालक डॉ.सुरेश झंवर यांनी आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था परिषदेची माहिती सांगितली.
सहकार सचिव राजगोपाल देवरा यांनी शिर्डी येथे आयोजिलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था परिषदेची माहिती सांगितली. शेवटी असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे रणजीत हेत्तीआराची यांनी आभार प्रदर्शन केले.
00000
मुळा प्रवरा वीज कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु
- मुख्यमंत्री
शिर्डी दि.7- श्रीरामपुर तालुक्यातील मुळा प्रवरा वीज कामगार संघटनेचा प्रश्न सोडविण्यासाठी ऍ़सेट व्हॅल्युएशन कमिटी स्थापन करुन त्याद्वारे कामगारांचा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात मुळा प्रवरा वीज कामगार संघटनेच्यावतीने मुख्यमंत्रीमहोदयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना ते बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री बबनराव पाचपुते, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसुल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी संजीवकुमार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, जानेवारी,2011 मध्ये मुळा प्रवराचे लायसन्स नुतनीकरण न झाल्यामुळे प्रश्न वाढला आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध तीन समित्या नियुक्त करुन प्रश्न सोडविण्याच्या सुचना होत्या. कामगारांच्या समस्येवर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी ऍ़सेट व्हॅल्युएशन समिती नेमण्यात येईल. आणि या समितीमार्फत जो निर्णय होईल तो सर्वमान्य तोडगा असेल असे म्हणाले. या संदर्भातील मंत्रालयाशी पूर्वी केलेला पत्रव्यवहार मंत्रालयातील झालेल्या आग दुर्घटनेमुळे सर्व फाईल्स ची पुनर्रचना आम्ही करणार आहोत. गरज पडल्यास विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भात बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुळा प्रवरा वीज कामगारांच्या प्रश्नासंदर्भातील भावना मुख्यमंत्री महोदयांनी समजून घेतल्यात. उपमुख्यमंत्री महोदयांमार्फत मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातील फाईल्स पुन्हा सादर करु. आगाऊ रक्कम म्हणून 129 कोटी रुपये कामगारांना द्यावेत. मुळा प्रवराच्या 100 कामगारांनी आता स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. कामगारांच्या भावना तीव्र आहेत. सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
00000
सहकारी पतसंस्थांची ऑडिट फी
नागरी सहकारी बँकाएवढीच आकारणार
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
शिर्डी दि.7- राज्यातील सहकारी पतसंस्थांची ऑडिट फी नागरी सहकारी बँकाएवढीच आकारण्याचा निर्णय येत्या दोन तीन दिवसात घेतला जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शिर्डी येथे केली.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2012 व स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाच्या सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव पाचपूते, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सहकारी पतसंस्था समाजातील तळागाळातील गोरगरीब जनतेला पतपुरवठ्याद्वारे आर्थिक ताकद देत असतात. त्यामुळे वित्तीय संस्थांमध्ये पतसंस्थांना विशेष महत्व आहे. हे पतसंस्थांचे स्थान अधिक बळकट, सुदृढ होण्यासाठी त्यांना आर्थिक ताकद देणे आवश्यक आहे. त्यांचा कारभार अधिक पारदर्शक, मजबूत होण्याकरिता कायद्याचा वापर करण्यापेक्षा त्यांच्यातील अपप्रवृत्तीचे आत्मशुध्दीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही निर्बंध शासनाने घातले असले तरी सक्षमरित्या सुरु असणाऱ्या पतसंस्थांना त्याचा फायदा होईल असा विश्वास ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
पतसंस्थांच्या अडीअडचणी, समस्यां विषयी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या सनदेचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात पतसंस्थांचे जाळे निर्माण झाले परंतु काही संस्था नुसत्या कागदावर आहेत त्यांची नोंदणी रद्द करुन त्या बंद केल्या पाहिजेत.
ज्या चांगल्या संस्था कार्यरत आहेत त्या अधिक मजबूत व सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यात काही बदल करण्यात येत आहे ते सहकारी संस्थांच्या हिताचे राहतील. राज्यातील ठेवीदारांचे हीत जपण्यासाठी तयार केलेल्या सहकारी कायद्यास लवकरच मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात पुरोगामी व आघाडीचे ठरणार आहे असे ही त्यांनी सांगितले.
सहकारातील काही अपप्रवृत्तींमुळे सहकार चळवळी विषयी सर्वसामान्यांचा उडालेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी सहकार विभागामार्फत प्रयत्न सुरु आहे. सहकारी संस्थेबरोबर ठेवीदार व सभासदांचे हित जपण्यासाठी सहकार कायद्यात काही बदल करुन या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. असे सांगून सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पतसंस्थांनी सक्षमतेने काम करुन समाजात परिवर्तन करावे असे सांगितले.
सहकार चळवळीने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करुन शेतमजूर, गोरगरीबांना आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यातून राज्याचे विकासाचे काम झाले. ग्रामीण भागातील छोटे छोटे व्यापारी व्यावसायीकांना या पतसंस्थांचा आधार आहे. मुठभर लोकांमुळे ही चळवळ बदनाम होते आणि खाजगीकरणास उत्तेजन मिळते म्हणून सहकारातील अप प्रवृत्तींना थारा देवू नये, मूळ सहकार कायद्यात बदल करतांना सहकार चळवळीस पोषक व पूरक वाढीच्या दृष्टिने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
ग्रामीण व शहरी भागातील जनतेला खात्रीने कर्ज मिळेल असा विश्वास असल्याने सहकारी पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणावर राज्यात जाळे निर्माण झाले. या पतसंस्थांत चुकीचे काम करणाऱ्याला पाठीशी घालण्यापेक्षा सुधारण्याचे काम करावे पतसंस्था चालकांनी आपण विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करावे असे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.
सहकारी संस्था स्थापण्याच्या अधिकाराला घटनेत मुलभूत अधिकाराचा दर्जा देण्याची 97 वी घटनादुरुस्ती अलिकडेच संसदेत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सहकार कायद्यात ही सुधारणा व बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे सहकार चळवळ राज्यात अधिक निकोपपणे वाढेल असा विश्वास सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केला.
राज्यातील पतसंस्थेत बचत ठेवीचे काम करणारे कर्मचारी ना नफा ना तोटा या भावनेतून दैनंदिन किमान पाचशे लोकांपर्यंत पोहचत असतात असे काम इतर कोणत्या ही सहकारी संस्थांद्वारे होत नाही त्यामुळे पतसंस्था संबंधी सकारात्मक भूमिका घेवून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केली तर सहकारी पतसंस्थांच्या अडीअडचणी व मागण्यांची सनद फेडरेशनचे कार्याध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देवून सहकार चळवळीत आर्थिक चूका करुन संस्था बुडविणाऱ्यांना शिक्षा व्हावी परंतु इतरांना त्याचा त्रास होवू नये असे सांगितले.
यावेळी फेडरेशनच्यावतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते वसंतराव शिंदे, प्रकाश पोहरे, राधेश्याम चांडक, राजुदास जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी पतसंस्थांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते दीपस्तंभ पुरस्कार ही देवून गौरविण्यात आले. प्रारंभी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पतसंस्थांच्या एटीएम कार्ड व मशीनचे उद्घाटन ही करण्यात आले.
राज्याचे सहकार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी प्रास्ताविक केले. या समारंभास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सुधीर तांबे, आमदार नीलेश पारवेकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आ.भाऊसाहेब कांबळे, जयंत ससाणे, पांडूरंग अभंग, सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ACCU) चे अध्यक्ष चॅलेरम्पॉल व इतर आठ देशातील सहकारी प्रतिनिधी व पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
साईबाबांचे दर्शन घेतले
शिर्डी दि.7- राज्याचे मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळी शिर्डी येथील श्रीसाईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी मंदिरातील साईबाबांची पाद्यपुजा व आरती केली. संस्थानचे पुजारी बाळासाहेब जोशी आणि सुलाखे यांनी पौरोहित्य केले.
जिल्हाधिकारी तथा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य श्री.संजीवकुमार आणि कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी साईबाबांची मुर्ती, प्रसाद आणि वस्त्र देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री बबनराव पाचपुते, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसुल राज्यमंत्री प्रकाश दादा सोळंके, संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, आदी मान्यवरांनीही श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा