गुरुवार, ५ जुलै, २०१२

आगीपासून बचावासाठी वारंवार रंगीत तालमी घेणार
दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यात
नागरिकांचा सहभाग घेणार – मुख्यमंत्री

मुंबई, दिनांक 5 जुलै : दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट किंवा आगीसारख्या घटनांवेळी परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर आणण्यासाठी नागरिकांचा आणि प्रसार माध्यमांचा सहभाग महत्वाचा असतो. हा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.आगीसारख्या प्रसंगी सुखरुप बाहेर पडता यावे यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इमारत रिकामी करण्याच्या रंगीत तालमी वारंवार घेण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
राज्य सुरक्षा परिषदेच्या चौथ्या बैठकीत ते बोलत होते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर या परिषदेचे गठन करण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या सुरक्षेला आपले सर्वोच्च प्राधान्य असून आतंकवादाशी मुकाबला करण्यात राज्याचे पोलीस दल कमी पडणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुंबई तसेच उर्वरित राज्यात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याबाबत राज्य सरकारने उचललेल्या पावलांची सर्वप्रथम या परिषदेला माहिती करुन देण्यात आली. याशिवाय राम प्रधान समितीच्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती देखील सांगण्यात आली. पोलीस दलातर्फे राज्यातील दहशतवादविरोधी उपयायोजनांवर आणि बनावट नोटांच्या राज्यातील सुळसुळाटाबाबत सादरीकरण करण्यात आले.
श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य सुरक्षा परिषदेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध उपसमित्यांनी अत्यंत उत्तम काम केले असून, त्यांच्या शिफारशी आणि सूचनांचा विचार सुरक्षेबाबतचे धोरण ठरवितांना केला जाईल. या उपसमित्यांची बैठक वर्षातून किमान दोन वेळा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी पत्रकार व माध्यमांचे सहकार्य कशा रितीने घेता येईल, यादृष्टीने अशा प्रसंगी प्रसारमाध्यमासंदर्भातील धोरण निश्चित करण्यात येईल. दहशतवाद विविध रुपाने आव्हान उभे करीत असून नागरिकांच्या मदतीने दहशतवादविरोधी लढाई अधिक तिव्र करता येवू शकेल, यासाठी कायम स्वरुपी यंत्रणा उभी करता येते का याचा अभ्यास करण्यात येईल असे चव्हाण म्हणाले.
या बैठकीस गृह मंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकास मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील, दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, मुख्यसचिव जयंत कुमार बांठिया,राज्याचे पोलीस महासंचालक के.सुब्रमण्यम, विशेष पोलीस महानिरिक्षक (फोर्स 1) सदानंद दाते, मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, महाअधिवक्ता डरायस खंबाटा, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, तटरक्षक दलाचे महासंचालक ए.के.हरबोला, शिपींग कॉरर्पोरेशनचे महासंचालक दिपक शेट्टी, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन, ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त आर.के.राजीव, कोकण रेंजचे पोलीस महानिरिक्षक सुखविंदर सिंह यांच्यासह राज्य सुरक्षा परिषदेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.   
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा