मुख्यमंत्री
रविवारी दिवसभर कार्यालयात
मुंबई,
दिनांक 2 जुलै : रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही मुख्यमंत्री
श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवसभर मंत्रालय, तसेच विधानभवन येथील कार्यालयात
कामकाज पाहिले. दिनांक 21 जूनच्या
दुर्घटनेनंतर मंत्रालयातील सर्व कार्यालये पूर्वस्थितीत आणण्यासंदर्भात त्यांनी मुख्य
सचिव जयंत कुमार बांठिया यांच्याशी चर्चा केली.
सकाळी 10 वाजता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुख्यमंत्री चव्हाण
यांनी माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली. त्यानंतर विधानभवनाच्या
प्रांगणातील स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री.शिवाजीराव
देशमुख, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.माणिकराव
ठाकरे, आमदार सर्वश्री सुभाष चव्हाण, मधु चव्हाण, संजय राठोड, मुख्यमंत्र्यांचे
सचिव श्री.आशिषकुमार सिंह, डॉ.नितीन करीर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यानंतर विधानभवन येथील मुख्यमंत्री कार्यालयातील
शासकीय कामकाज पाहून कार्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्याने
अग्रक्रम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील दुर्घटनेची
सर्वसामान्य जनतेला झळ बसणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी
केले. तसेच येत्या 9 जुलै पासून होणाऱ्या
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती करून
घेतली.
00000
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन
राज्य शासनाच्या पाठीशी
मुंबई, दिनांक 2 जुलै : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल
जोशी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून 21 जूनच्या
दुर्घटनेसंदर्भात तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मंत्रालयातील सर्व कार्यालये
पूर्वस्थितीत येण्यासाठी आपण करीत असलेल्या प्रयत्नात असोसिएशनचे या कामी संपूर्ण
सहकार्य राहील, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा