शनिवार, ३० जून, २०१२


             
बा विठ्ठला ! राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे

                                 -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण    

            पंढरपूर.दि.30: सध्या राज्याला दुष्काळाच्या झळा पोहचताहेत. बा विठ्ठला! राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होउ दे! लवकरात लवकर पाऊस पडू दे! अन् राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे! अशी प्रार्थना विठ्ठल चरणी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

      आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते झाली. महापूजे नंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

        यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा उज्वला भालेराव, पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, उल्हासदादा पवार, आ. विलास लांडे, आ. भाऊसाहेब खाडे, पुणे विभागीय  आयुक्त प्रभाकर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     राज्यावर येणा-या आपत्तीला सामोरे जाण्याचे तसेच दुष्काळाला भेदण्याचे सामर्थ्य पांडूरंगाने राज्य शासनाला देवो त्याचबरोबर समाजातील सर्व वर्गाचे प्रश्न सोडविण्यात शासन सफल ठरो अशीही मागणी विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

      श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्याचा तर पुनम बेलदार यांच्या हस्ते. सौ. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
मानाचे वारकरी

     मुख्यमंत्री चव्हाण यांच्या समवेत शासकीय महापूजेचा मान यंदा मुरलीधर धोंडीबा फड (वय 40) व सौ. दिपाली मु.फड (वय 30) मु.पो. हकनकवाडी ता. उदगीर जि. लातूर यांना मिळाला. श्री फड हे उच्चशिक्षीत (एम.ए.बी.पी.एड) असून त्यांचा व्यवसाय शेती व वीटभट्टीचा आहे.त्यांना 2 मुले व 1 मुलगी असून गेल्या 50 वर्षांपासून त्यांची वडिलोपार्जित वारीची परंपरा आहे.मात्र आता वडील थकल्यामुळे गेली तीन वर्ष ते स्वत: आषाढी वारीसाठी येतात.विशेष म्हणजे अद्यापही त्यांनी एकत्र कुटुंब पध्दती जोपासण्याला प्राधान्य दिले असून त्यांच्या कुटुंबातील संख्या 35 इतकी आहे.मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा सत्कार करुन, एस.टी तर्फे देण्यात येणारा मोफत प्रवास सवलतीचा वार्षिक पास त्यांना प्रदान केला.  

   शूरवीरांचा सत्कार
     नुकत्याच मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत प्राणाची बाजी लावून तिरंग्याचे रक्षण करणा-या सर्वश्री राजेंद्र कानडे, दिपक अडसूळ, गणेश मुंज, सुरेश बारीया, प्रेमजी रोज, सुरेंद्र जाधव,  पंडीत केंदळे आणि विशाल राणे या शूरवीरांचा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

    विठ्ठल मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे, मंदिर समितीचे सदस्य सर्वश्री बाळासाहेब बडवे, वा.ना उत्पात, प्रा.जयंत भंडारे, वसंत पाटील, अरविंद नळगे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार, सौ. बेलदार आदी मान्यवर उपस्थित होते.

                                                       0000

                        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा