मंगळवार, १७ जुलै, २०१२



सामाजिक लढ्यांच्या प्रणेत्या हरपल्या
मुख्यमंत्र्यांची मृणालताईंना श्रध्दांजली
मुंबई, दिनांक 17 जुलै :  ज्येष्ठ समाजवादी नेत्या श्रीमती मृणाल गोरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडणारा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेल्या जनतेच्या नेत्याला आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणतात की, ज्या काळात महिलांनी सामाजिक कार्याच्या चळवळीत उतरणे अशक्य होते, त्या कालावधीत श्रीमती मृणाल गोरे यांनी अहिल्या रांगणेकर यांच्या जोडीने महिला आणि पिडीतांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधी यांची विचारसरणी आयुष्यभर अंगिकारलेल्या मृणालताईंनी सामाजिक कार्याचा आदर्श समाजासमोर उभा केला. नागरी हक्क, महिलांचे हक्क, कामगारांचे प्रश्न असोत किंवा महागाईविरुध्दची लढाई, मृणालताईंनी गोरगरीबांच्या प्रत्येक लढ्याचे नेतृत्व केले.
आमदार तसेच खासदार म्हणूनही त्यांनी या सर्वोच्च सभागृहांमध्ये जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आणि परिणामत: काही चांगले कायदे अस्तित्वात आले. अगदी कांही वर्षांपूर्वी नागरी निवारा हक्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी गरिबांना मुंबईत हक्काची घरे देण्यासाठी  लढा दिला. महिलांना राजकारणात आरक्षण तसेच लिंगनिदान चाचण्यांवर प्रतिबंध या दोन्हीही गोष्टींसाठी मृणालताईंच्या लढ्याला निश्चितच श्रेय द्यावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.
                                      00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा