ठाणे बायपास
रस्त्याबरोबरच शहरांतर्गत
रस्त्यांच्या
विकास कामांकडे अधिक लक्ष द्या
-
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7 जून : ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन
प्रस्तावित केलेल्या ठाणे बायपास रस्त्याबरोबरच शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या
रस्त्यांच्या विकास कामांवर अधिक लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी दिले.
ठाणे शहरातील बायपास रोड आणि वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट
प्रोजेक्टचे सादरीकरण ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी केले,
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ठाणे
शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हे शहर मुंबईला जवळ असल्याने आणि वाढत्या
औद्योगिकरणामुळे गेल्या 4-5 वर्षात या ठिकाणच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ
झाली. वाढती लोकसंख्या तसेच प्रवासी
वाहतूक आणि खाजगी गाड्या, रिक्षा यामुळे मोठ्या
प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. ही
कोंडी रोखण्यासाठी बायपास बरोबरच शहरातंर्गत रस्त्यांकडेही अधिक लक्ष देण्याची
सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील 80 टक्के वाहतूक शहराबाहेरून जाण्यास मदत होईल. तसेच शहरातील
प्रदूषण, अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वास ठाणे
महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी यावेळी
व्यक्त केला.
यावेळी एमएमआरडीए चे आयुक्त राहूल
आस्थाना, ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव,
टी. सी. बेंजामिन, प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, मे.ने- पॅालिसन इंजिनिअर्स ॲण्ड
आर्किटेक्टसचे सी.ई.ओ. क्रिस पॅालिसन, प्रोजेक्ट डायरेक्टर, गुल क्रिपलानी, मॅथ्यु
मॅली,आर्किटेक्ट ॲन्ड अर्बन प्लॅनर आदी
मान्यवर उपस्थित होते.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा