राज्यात चार नवीन अभयारण्यांची स्थापना
नव्या उमरेड अभयारण्यास मान्यता
-
मुख्यमंत्री
मुंबई, दिनांक 7 जून : राज्यातील नवीन माळढोक,
नवीन बोर, नवीन नागझिरा, नवीन नवेगाव अशा एकूण 510 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या 4
अभयारण्यांची स्थापना आणि ताडोबा ते नवेगावमधील उमरेड येथील अभयारण्यास मान्यता
दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
आज
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 6 वी बैठक मुख्यमंत्री चव्हाण यांच्या
अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस
वनमंत्री डॉ.पंतगराव कदम उपस्थित होते. प्रारंभी वन विभागाचे प्रधान सचिव
श्री.प्रविणसिंह परदेशी यांनी स्वागत केले.
वन्यजीव संरक्षित क्षेत्रातून ऐच्छिक पुनर्वसन होण्यास तयार असलेल्या
गावांमधील कुटुंबांच्या पुनर्वसनाला गती देण्याकरिता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय
व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या पुनर्वसन धोरणाप्रमाणे राज्य शासनाच्या
अर्थसंकल्पित अनुदानातून आणि कॅम्पा तसेच 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून
पुनर्वसनासाठी 10 लाख रुपयांचे पॅकेज देण्याचे मान्य करण्यात आले. या पॅकेजप्रमाणे नवेगाव, टिपेश्वर आणि कोलसा
गावात तसेच इतर गावातील पुनर्वसित होणाऱ्या लोकांना लाभ होणार आहे.
कोलामार्का जगातील रानम्हशीचे अस्तित्व असलेले एकमेव ठिकाण
पूर्ण जगामध्ये रानम्हशीचे एकमेव अस्तित्व असलेले गडचिरोली जिल्ह्यातील
कोपेला कोलामार्का हे क्षेत्र आहे. या
ठिकाणच्या वनक्षेत्राला कन्झर्वेशन रिझर्व्ह जाहीर करण्याची शिफारस या बैठकीत
करण्यात आली. त्याचबरोबर वन्यजीव क्षेत्रात तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत
असणाऱ्या वनक्षेत्रपालांना वन्यप्राणी संरक्षणार्थ 100 अतिरिक्त वाहनांचा पुरवठा
करण्यासाठी या बैठकीत मान्यता देण्यात आली.
त्याचबरोबर मुंबईला आवश्यक पिण्याच्या पाण्याकरिता गारगाई नदी प्रकल्पासाठी
सर्वेक्षण आणि तपास कार्याची शिफारस करण्यात आली.
राष्ट्रीय महत्वाचे मुंबई-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कोरिडॉर, तसेच मुंबई-गोवा
राष्ट्रीय महामार्ग क्र.17 या प्रकल्पातंर्गत वन्य प्राण्यांना अधिवास सुरक्षित
ठेवण्यासाठी वन्य प्राण्यांना रेल्वे व
रस्ते पार करण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक भ्रमण मार्ग किंवा भुयारी मार्ग तयार करण्याची
शिफारस करून राष्ट्रीय वन्य प्राणि संरक्षण मंडळाकडे सादर करण्याचे ही सुचित
करण्यात आले.
या बैठकीस मंडळाचे सदस्य दिलीप यार्दी, डॉ.एरिक भरुचा, श्री.गोपाळ बोधे,
विश्वास काटदरे, वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ.नंदकिशोर व संबंधित
खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा