मंगळवार, १९ जून, २०१२



मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी इचलकरंजीतील आयजीएम रूग्णालयास भेट देऊन काविळ झालेल्या रुग्णांची विचारपूस केली.

पंचगंगेच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी
सर्व संबंधितांची मुंबईत बैठक,
मुख्यमंत्र्याकडून काविळ रुग्णांची विचारपूस

औषधांसाठी पन्नास तर मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत

कोल्हापूर दि. 19 : पंचगंगा नदी खोरे प्रदूषणमुक्त करण्यासाठी  केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच पंचगंगेच्या प्रश्नाबाबत लवकरच मुंबईत सर्व संबंधितांची बैठक बोलविली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. इचलकरंजीतील काविळीच्या साथीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रूपये मदत देण्याची आणि काविळीवरील औषधांसाठी इचलकरंजी नगरपालिकेला पन्नास लाख रुपयांची मदतही त्यांनी आज जाहीर केली.
इचलकरंजीतील काविळीच्या प्रश्नाबाबत आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. इचलकरंजी नगरपरिषदेच्या कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीस वने आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार जयवंतराव आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक,  आमदार सा.रे. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत आदी उपस्थित होते. या बैठकीपुर्वी मुख्यमंत्री चव्हाण यांनी इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन काविळीच्या रुग्णांची विचारपूस केली.
मुख्यमंत्री यांनी सांगितले की, वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण यांच्यामुळे सर्वत्रच प्रदूषणाचा प्रश्न आहे. इचलकरंजीतही हीच समस्या आता पुढे आली आहे. पण त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन सर्व स्तरावरून प्रयत्न करीत आहे. पण इचलकरंजीत सांडपाणी व्यवस्था, तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. इचलकरंजीतील सर्व उद्योगातील सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतरच नदीत सोडले जाईल, याचीही दक्षता घ्यायला हवी. इचलकरंजीत या व्यवस्था उभारण्यासाठी यूआयजीएसएसएमटी योजनेतून  निधी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासन पाठपुरावा करेल.
काविळीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. यापुर्वी ही मदत एक लाख रुपये दिली जाईल, असे सांगितले होते. काविळ झालेल्या रुग्णांना पाणी उकळून पिता यावे यासाठी इचलकरंजी शहर आणि हातकणंगले तालुक्यासाठी रॉकेलचा वीस टक्के जादा कोटा मंजूर केला जाईल, असे त्यांनी जाहिर केले. इंदिरा गांधी रुग्णालयात अतिदक्षता कक्ष उभारण्यासाठी नगरपरिषदेने केलेल्या निधीची मागणी पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नदीचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर यापुढे सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबत सर्व साखर कारखानदारांची बैठकही घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आपली भूमिका आधिक जबाबदारीने बजावावी, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार निवेदीता माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रभारी जिल्हाधिकारी  अप्पासाहेब धुळाज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य़कारी अधिकारी दीपक म्हैसेकर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, मुख्याधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते. बैठकीत काविळीने मृत पावलेल्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

·       मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणा
मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये
औषधांसाठी पन्नास लाख रुपये
इचलकरंजी  आणि हातकणंगले तालुक्यासाठी वीस टक्के जादा रॉकेलचा कोटा
आयजीएममधील आयसीयूसाठी आवश्यक तो निधी देणार.
काविळीने मृत्युमुखी पडलेले मुख्याधिकारी चव्हाण यांच्या मुलीला नगरपालिकेत नोकरी देणार.


इचलकरंजीतील काविळीच्या प्रश्नाबाबत मंगळवारी आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या बैठकीत बोलतांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. शेजारी वने आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदमगृह राज्यमंत्री सतेज पाटीलखासदार राजू शेट्टीखासदार जयवंतराव आवळेआमदार सुरेश हाळवणकरनगराध्यक्षा रत्नप्रभा भागवतमाजी मंत्री प्रकाश आवाडेमाजी आमदार पी. एन. पाटील आदी.
                                 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा