बुधवार, २० जून, २०१२




 वैद्यकीय शिक्षण
20 जून 2012

वैद्यकीय अध्यापकांना व्यवसायरोध भत्तादेण्याचा निर्णय

राज्यातील वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक यांना व्यवसायरोध भत्ता (एन.पी.ए.)  लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा भत्ता 1 जुलै 2012 पासून लागू होईल. 
नांदेड, धुळे, यवतमाळ, अंबाजोगाई तसेच अलिबाग, नंदूरबार आणि सातारा येथे सुरु करण्यात येणाऱ्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अध्यापकांना 50 टक्के दराने आणि अन्य ठिकाणच्या वैद्यकीय अध्यापकांना 35 टक्के दराने व्यवसायरोध भत्ता मिळेल. वेतनाची एकूण रक्कम 85 हजार रुपयांपेक्षा अधिक होणार नाही अशी अट घालण्यात आली आहे. 
-----0-----

                                                                          सार्वजनिक आरोग्य
20 जून 2012
सार्वजनिक आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना
व्यवसायरोध भत्ता देण्याचा निर्णय

राज्यातील सर्व म्हणजे 9156 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 1 एप्रिल 2012 पासून मूळ वेतनाच्या 35 टक्के एवढा व्यवसायरोध भत्ता (एन.पी.ए.) देण्याचा  निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी नॉन क्लिनिकल पदांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय आहे.  परंतु क्लिनिकल पदांवर कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय नव्हता.  हा भत्ता अनुज्ञेय असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या 4,144 असून भत्ता अनुज्ञेय नसणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या 5012 एवढी आहे.  हा भत्ता नसल्यामुळे या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळत नव्हते.  तसेच दुहेरी प्रणालीमुळे विसंगती निर्माण झाली होती. 
-----0-----

                                                                               कृषी
20 जून 2012
 राज्यात सरासरीच्या 74 टक्के पाऊस
2 टक्के पेरण्या, 13 टक्के धरण पाणीसाठा
 राज्यात खानदेश वगळता बहुतांश भागात मोसमी पावसाचे आगमन झाले. 19 जून पर्यंत 104 मिलीमिटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या 74 टक्के एवढा आहे.  गेल्या वर्षी याच सुमारास राज्यात 109 टक्के पाऊस झाला होता. सध्या राज्यातील धरणांमध्ये 13 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
4 जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
       राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 80 ते 100 टक्के पाऊस झाला. 
          रायगड,नाशिक,सातारा,सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 60 ते 80 टक्के तर ठाणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये 40 ते 60 टक्के पाऊस झाला.
नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली या जिल्ह्यात 40 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.
2 टक्के क्षेत्रावर पेरणी
          राज्यात खरिपाचे क्षेत्र 132.34 लाख हेक्टर असून आतापर्यंत 2.24 लाख हेक्टर म्हणजेच 2 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  भाताची पेरणी सरासरी क्षेत्राच्या 4 टक्के तर कापसाची पेरणी 5 टक्के झाली आहे.  मका, भुईमूग या पिकांची पेरणी केवळ 1 टक्का क्षेत्रावर झाली आहे. 
मागील वर्षी याच सुमारास ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडिद, सूर्यफूल, सोयबीन अशा इतर पिकांच्या पेरण्याही जोरात झाल्या होत्या.
-----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा