मोनोरेल आणि पूर्व मूक्त मार्ग
वर्षअखेरीस वाहतुकीस खुला होणार
पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास
मुंबई, दि. 12 : वडाळा ते चेंबूर ही साडेनऊ किलोमीटर लांबीची मोनोरेल आणि
ऑरेंज गेट ते चेंबूर हा नऊ किलोमीटर लांबीचा ईस्टर्न फ्री वे (पूर्व मुक्त मार्ग) हे दोन्ही वाहतूक प्रकल्प यावर्षाअखेरीस वाहतुकीस खुले होतील, असा
आत्मविश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला. जमिनीची
अत्यंत कमी उपलब्धता आणि दाट लोकवस्ती असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात पायाभूत
सुविधांची उभारणी करण्याचे हे एकमेव उदाहरण आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी
जोडली.
एमएमआरडीएच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या वाहतूक विषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची
पाहणी आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या
पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सकाळी पावणेआठ वाजता वर्षा निवासस्थान येथून मिनीबसमधून सुरू झालेल्या या
पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, एमएमआरडीएचे
महानगर आयुक्त राहुल अस्थाना, मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे,
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव
यूपीएस मदान, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह, डॉ. नितीन करीर, अतिरिक्त
महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, पोलिस आयुक्त अरूप पटनायक आदी उपस्थित होते.
ऑरेंजगेट येथून सुरूवात झालेल्या या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी इस्टर्न
फ्री वे येथून पांजरपोळ लिंक रोड, वडाळा, भक्ती पार्क येथे असलेल्या मोनोरेल
स्टेशनची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर बीएआरसी येथील डोंगराखालून जाणाऱ्या
चार पदरी रस्ते असणाऱ्या बोगद्याची पाहणी केली. त्यानंतर घाटकोपर स्टेशनजवळील
मेट्रो रेल्वे स्टेशनची पाहणी केली. ही सर्व पाहणी करताना त्यांनी मिनीबसचा वापर
करून त्यांच्या समवेत असलेल्या अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली.
एमएमआरडीए तर्फे सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, पूर्व उपनगरातील
वाहतुकीस चालना देणारी ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे, अशा
सुचना त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
ईस्टर्न फ्री वे प्रमाणेच मोनो रेलचे काम जानेवारी 2013 पर्यंत पूर्ण होईल,
अशी खात्री देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे कामही
मार्च 2013 पर्यंत पूर्णत्वास येईल.
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल श्री चव्हाण म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील
कार डेपोच्या जमिनीवरील मॅनग्रोव्हमुळे केंद्रीय पर्यावरण खात्याची मान्यता अद्याप
मिळालेली नाही. दुसरा टप्पा पूर्ण करण्यामध्ये ही मोठी अडचण असून हा प्रश्न
सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत एमएमआरडीएच्यावतीने जी कामे करण्यात आली
त्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे पूनर्वसन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी
दिली.
00000
क्षणचित्रे :-
· सर्व प्रकल्पांची पाहणी
मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट घालूनच केली.
· मुख्यमंत्र्यांच्या पाहणी
दौऱ्याच्यावेळी मिनीबसमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते प्रत्येक ठिकाणी
जातीने माहिती घेत होते.
· अत्यंत उत्साहाने त्यांनी मेट्रो
रेल्वे स्टेशन घाटकोपर येथे जाऊन संबंधितांकडून माहिती घेतली.
· वडाळा येथे मोनो रेलच्या
केबिनमध्ये जाऊन त्यांनी मोनोरेलच्या डब्यांची माहिती घेतली.
· मुंबई शहर बेटाच्या भौगोलिक
विस्ताराची आणि विविध पायाभूत प्रकल्पांची नेमकी ठिकाणे जाणून घेण्यासाठी श्री
चव्हाण यांनी गुगल मॅपचा वापर केला. दौऱ्यादरम्यान ते सातत्याने त्याचा संदर्भ घेत
होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा