शनिवार, ९ जून, २०१२


ज्ञान आणि तंत्रज्ञानाधारीत युगात
महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची
                                  -राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

    बारामती, दि. 9 : ज्ञान आणि तंत्रज्ञानाधारीत आजच्या युगात महाविद्यालयांची भूमिका खूप  महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च ज्ञान देत असतानाच विद्यार्थ्यांची  विश्लेषणात्मक शक्ती जागृत केली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी केले.
    बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे  उद्घाटन श्रीमती पाटील यांच्या हस्ते आज झाले,  तेव्हा त्या बोलत होत्या.  राज्यपाल के. शंकरनारायणन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नामवंत  शिक्षणतज्ज्ञ डॉ. देवीसिंह शेखावत, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार  यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. 
    आपला देश  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर देश आहे. ही आघाडी कायम राखण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे सांगून श्रीमती पाटील म्हणाल्या की, नवान्वेषण, संशोधन आणि तंत्रज्ञानाने सजलेले भविष्य आपली प्रतिक्षा करीत आहे. आपल्या महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी या आव्हानांना पेलून त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. ज्याद्वारे भारत एक ज्ञानशक्ती म्हणून उदयास येईल.
    आपल्या विशाल देशाच्या दृष्टीने पुरेसे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांसारख्या संस्थांची नितांत गरज असल्याचे सांगून राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, " सध्या देशात सुमारे साडेतीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी सुमारे साडे चार लाख अभियंते तयार होतात. परंतु आपल्याला दरवर्षी आणखी सुमारे सत्तर हजार अभियंत्यांची उणिव भासेल.  त्या दृष्टीने हे कॉलेज उपयुक्त ठरेल. विद्या प्रतिष्ठानतर्फे 30 मोबाईल कॉम्प्युटर बसेस खेडोपाडी फिरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान देण्याचे कार्य करतात हे जाणून मला अतिशय कौतुक वाटले. 
          बारामतीत पावसाचे प्रमाण जेमतेम आहे.  परंतु शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी बांधवांनी  या समस्येवर मात करुन शेती व्यवसायाला विविध पूरक उद्योगांची साथ देऊन या भागाचा  केलेला विकास उल्लेखनीय आहे. येथील प्रत्येक गावात सहकारी संस्थांचे जाळे उभे राहीले आहे. साखर कारखाने असो किंवा दूध संघ सर्वच सहकारी संस्था नावलौकिकास पात्र ठरल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव, कृषी मालासाठी निर्यांत सुविधा केंद्र यासारखे नवनवीन उपक्रम शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी यावेळी केला.            
    बारामती मधल्या विविध प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर शिक्षण, तंत्रज्ञान, डेअरी हे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घटकांचे ब्ल्यु प्रिंट बारामतीमध्ये  तयार असल्याचे लक्षात आले असून आज राज्याला अशा एकात्मिक विकासाची गरज असल्याचे  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी अधोरेखित केले. राज्यात आज साक्षरतेचे प्रमाण 80 टक्के आहे मात्र गुणात्मक शिक्षणाचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आज ज्या गुणात्मक शिक्षणाची विद्यार्थ्यांना गरज आहे ते शिक्षण विद्या प्रतिष्ठानमध्ये दिले जात असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.
    बारामती येथील टेक्सटाईल पार्कच्या प्रगतीबाबत  बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज 60 एकराचा माळ टेक्सटाईल्स पार्कने फुलून गेला असून या ठिकाणी 80 टक्के महिलांना रोजगार मिळतो आहे, हे आजच्या काळात कौतुकास्पद कार्य असून काही दिवसांनी बारामती  भारताचे मँचेस्टर होण्यास वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालाची निर्यात होणे गरजेचे आहे. त्यासाठी येथून पुढे शेतमालावर निर्यात बंदी आणू नये अशी विनंती देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. 
    नवी पिढी ही देशाची मोठी संपत्ती आहे.  या सारखी दुसरी मोठी संपत्ती नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यावेळी केले. बारामतीच्या आजुबाजुच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. आज मागे वळून पाहताना, या संस्थेचे अनेक विद्यार्थी अमेरिका, रशिया, ब्रिटन या विकसित राष्ट्रांमध्ये महत्वाच्या जागांवर काम करत आहेत.  ही बाब आपल्यासाठी विशेष आनंद देणारी असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
    पुणे, नगर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद बीड येथील शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी 15 लाख लिटर दूध वाहून नेण्यासाठी दौंड ते दिल्ली रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली.
    मोठं ध्येय समोर ठेवून 1972 ला ही संस्था सुरु झाली. आज प्रायमरी  शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विविध विद्या शाखांचे शिक्षण या संस्थेत दिले जात  असून  विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या 156 एकर परिसरात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये आज 22 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. 
   या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे आभार खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले.
000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा