शुक्रवार, ८ जून, २०१२



मुंबईतील 1995 पूर्वीच्या झोपडीधारकांची
तपशीलवार माहितीकोष तयार करावा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 8 : मुंबईतील सन 1995 पूर्वीच्या झोपडीधारकांना मोफत घरे देण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. यासाठी पात्र झोपडीधारकांची त्यांच्या राहत्या पत्त्यासह परिपूर्ण तपशीलवार माहिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज वर्षा येथे झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई, एस. आर. ए. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे आदी उपस्थित होते.
        पात्र झोपडीधारकांची परिपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी 1995 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात यावी. या कामासाठी उत्तम दर्जाच्या सॉफ्टवेअर कंपनीची मदत घेऊन कालबध्द पद्धतीने वेळेच्या मर्यादेत हे काम करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी दिले.  या कामास प्राधान्य देण्यात यावे. तसेच हे काम लवकर पूर्ण होण्यासाठी नवीन यंत्रणा उभारणे आवश्यक असल्यास ती उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शविली. सन 1995 पूर्वीच्या झोपडीधारकांच्या या माहितीमुळे किती मोफत घरे बांधावी लागणार आहेत याची नेमकी संख्या कळेल. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या कामास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
        मुंबई हे झोपडपट्टी मुक्त शहर बनविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे मुंबईतील केंद्र शासनाची जमीन, मालकी हक्काची जमीन व आरक्षित जागेवरील झोपड्यांची संख्या किती आहे. तसेच घरे बांधण्यासाठी मुंबईत एकूण किती क्षेत्र उपलब्ध आहे याची माहिती सादर करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले. 
धारावी पुनर्विकास
        धारावी झोपडपट्टीतील सेक्टर 5 चा पुनर्विकास करण्यात येणार आहे. याचे सादरीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. धारावी सेक्टर- 5 च्या पुनर्विकासासाठी म्हाडाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार या पुनर्विकासातंर्गत पहिल्या इमारतीच्या कामाच्या निविदा अंतिम कराव्यात. तसेच या संपूर्ण सेक्टरच्या नियोजनबध्द कामासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करुन या सेक्टरचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश
श्री. चव्हाण यांनी दिले. सेक्टर 5 मधील बांधकाम सुरु होणाऱ्या पहिल्या इमारतीमध्ये 356 लाभार्थ्यांसाठी घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी या बैठकीत दिली. 
0 0 0 0 0



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा