संतुलित पर्यावरणाचा शाश्वत
विकास
करणे गरजेचे - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 5 : पर्यावरणाच्या
रक्षणासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कठोर कायदे केले
आहेत. परंतू पर्यावरण विरुद्ध विकास असा विरोधाभास निर्माण होत असून पर्यावरण
संतुलन आणि विकास असा संतुलित शाश्वत विकास करणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र पर्यावरण विभाग आणि
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या `जागतिक पर्यावरण दिन` सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी
ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री संजय देवतळे,
पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे,
पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव
मिलिंद म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढते शहरीकरण, प्लॅस्टिक
यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यासाठी प्लॅस्टिकवर बंदी घालण्याचा शासन विचार
करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण आणि माणसांचे नाते
अतूट आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण पर्यावरणाच्या सोबत जगत असतो.
पर्यावरणाशी निर्मळ नाते ठेवणे हे प्रत्येक सृजन नागरिकाचे काम आहे. पर्यावरणावर
केवळ जीवन नाही तर आपले अस्तित्व अवलंबून आहे. पर्यावरणावर परिणाम होणारे कुठलेही
कारखाने असतील तर त्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना पर्यावरण विभागाला दिल्या
आहेत तसेच प्लॅस्टिक बंदीसाठीही लवकर निर्णय घेऊन कडक कारवाई करावी आणि पर्यावरण
जनजागृती करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी यावेळी सांगितले.
हवा, पाणी, ध्वनीप्रदुषण
मोठ्याप्रमाणात होत असल्यामुळे गावापासून ते शहरांपर्यंत जनजागृती करुन पर्यावरण
संतुलित राखले तर स्वच्छ परिसर व सुंदर शहर आपणासं पहावयास मिळेल. यासाठी प्रत्येक
नागरीकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी यावेळी
सांगितले.
पर्यावरणावर कायदे करुन चालणार
नाही तर पर्यावरण जागृतीसाठी प्रचार आणि प्रसार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
उद्योग आणि वाढते शहरीकरण यामुळे प्रदुषण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यावर अधिक लक्ष देण्याची आणि कडक कारवाई करुन
संतुलित पर्यावरण राखणे गरजचे आहे, असे पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी
यावेळी सांगितले.
महाराष्ट्र पर्यावरण विभाग आणि
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 जून या
कालावधीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण विषयक
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या
महोत्सवात लघुचित्रपट स्पर्धेच्या निमित्ताने प्राप्त झालेले लघुचित्रपट,
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यावरण विषयक चित्रपट प्रदर्शित केले जाणार
आहेत.
राज्यात प्रदुषण नियंत्रण व
समृद्ध पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
दिला जाणारा `वसुंधरा पुरस्कार-2012` (मोठे उद्योग)
चे वितरण करण्यात आले.
मे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
लि., डहाणू; औष्णीक ऊर्जा निर्मिती केंद्र यांना प्रथम क्रमांकाचा 1 लाख
रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र; मे.हिंदूस्थान युनिलिव्हर लि.
बुलढाणा यांना द्वितीय क्रमांकाचा पन्नास हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह,
सन्मानपत्र, तर तृतीय क्रमांकाचा 25 हजार चा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र मे.
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., पूणे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
नगरपालिका वसुंधरा पुरस्कार
दापोली नगरपंचायतीला तृतीय
क्रमांकाचा पुरस्कार 25 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव
करण्यात आले.
राज्यस्तरीय वसुंधरा लघुचित्रपट
पुरस्कार (हौशी गट)
आम्ही स्वच्छ`, स्वच्छ पूणे सेवा सहकारी
संस्थेला प्रथम क्रमांकाचा पन्नास हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र; यस वुई कॅन`, दिग्दर्शक कल्याण वाघमारे द्वितीय
क्रमांकाचा पंचवीस हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र; तर `गोमाता बचाव`, सचिन काळे तृतीय क्रमांकाचा
पंधरा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
व्यावसायिक गट
रिव्हर सतलज पोल्युटेड थ्रु
डोमेस्टिक ॲन्ड इंडस्ट्रियल डिस्चार्ज फ्रॉम लुधियाना, दिग्दर्शक कुलवत भाबरा
यांना प्रथम क्रमांकाचा पन्नास हजार रुपयांचा तर ए कॉल इन द फॉरेस्ट दिग्दर्शक
सव्यासाची पात्रा यांना द्वितीय क्रमांकाचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित
करण्यात आले.
फोटोथॉन 2012 मधील विजेते
फोटो फिचर
प्रियंका नाईक प्रथम, सुरेशचंद्र तारकर द्वितीय, श्रेयस शहा आणि धनंजय टिकम यांना
तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
बेस्ट फोटोग्राफर इंद्रनील बासू मलिक प्रथम तर
मिलन कापसी यांना द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा