शुक्रवार, १८ मे, २०१२


ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाबाबत
तातडीने अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निदेश
मुंबई, दि. 18 : ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असुन लवकरात लवकर यासंदर्भात चौकशी करुन अहवाल देण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव यांना आज दिले.
        श्रीष गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याच्या, त्याचप्रमाणे याप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या पत्रानुसार स्थगितीची कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि तातडीने ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांना सकाळी वर्षा निवासस्थानी बोलावुन आढावा बैठक घेतली. यासंदर्भात सखोल चौकशी करुन तातडीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
        मी मुख्यमंत्री झाल्यापासुन गृहनिर्माण आणि नगरविकासाचे घेतलेले विविध निर्णय पारदर्शी असुन सर्वांच्यासमोर आहेत. हे निर्णय सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुनच घेतले आहेत, हे दिसुन येते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा