रविवार, २२ एप्रिल, २०१२



प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी वसतिगृहाचे उद्घाटन आणि संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. समवेत माजी आमदार पी. एन. पाटीलगृह राज्यमंत्री सतेज पाटीलपालकमंत्री हर्षवर्धन पाटीलकामगार मंत्री हसन मुश्रीफमहापौर कादंबरी कवाळे.
प्री-आयएएस ट्रेनिंग संकुलाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अथक परिश्रमाची गरज
          कोल्हापूर दि. 22 : प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असून व्यक्तीमत्व विकासाबरोबरच सामाजिक प्रश्नांची जाणीव आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी वसतिगृहाचे उद्घाटन आणि संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होते.
            मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा नियोजन समितीने प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरची उभारणी करुन इतर जिल्ह्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिक्षण क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचा परतावा इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा अधिक असतो. धोरण ठरविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते आणि त्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी करतात. त्यामुळे असे अधिकारी निर्माण करताना उत्तम प्रशिक्षण देणे, दर्जेदार व्याख्यानांचे आयोजन करणे, सुसज्ज ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी अशा सुविधा पुरविणे आवश्यक आहे.
            मुख्यमंत्री म्हणाले, सुविधा नसतानाही ग्रामीण भागातील मुलांनी यश मिळविले, आता सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून यशस्वी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल. आपल्यासमोर शहरी आणि ग्रामीण दरी कमी करणे, भाषेतील अंतर कमी करणे आणि तंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारमध्ये काम करताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत बदल करुन मुलांचा ताण कमी केला. तसेच आयएएसची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. एमपीएससीतील अधिकाऱ्यांना पदोन्नतीने 54 व्या वर्षी आयएएस सेवेत घेता येते. पण एमपीएससी उत्तीर्ण मुलांना 35 व्या वर्षापर्यंत अशी परीक्षा देऊन या सेवेत घेण्याचा विचार सुरु आहे.
            पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने हे संकुल उभारले आहे. राज्य शासनाने मुलांना या संकुलाच्या माध्यमातून संधी प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात डिजिटल लायब्ररी, संचालकांचे निवासस्थान आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे.
            गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यात समन्वय असेल तर उत्तम कारभार चालतो. प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांनी कायद्याची आणि व्यवहाराची सांगड घालून लोकाभिमुख कारभार करावा.
            जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, राष्ट्र उभारणीत प्रशासकाची भूमिका महत्वाची आहे. महाविद्यालयाच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागाचा स्पर्धा परीक्षेत टक्का वाढेल.
            शिक्षण सहसंचालक पी. आर. गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, महापौर कादंबरी कवाळे, माजी आमदार पी. एन. पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अधीक्षक अभियंता डी. वाय. पाटील, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. वसंत हेळवी. विद्यार्थी-विद्यार्थींनी, प्राध्यापक उपस्थित होते.

 प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी वसतिगृहाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. समवेत डावीकडून गृह राज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर कादंबरी कवाळे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ.

 000000000000000000000000000000000000000000000000000000000000


कोल्हापुरात रविवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य  कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य इमारत  वसतिगृह इमारतीचे भूमीपूजन प्रसंगी कोनशिलेचे अनावरण करतांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. समवेत पालकमंत्री हर्षवर्धन पाटीलमहापौर कादंबरी कवाळेकामगार मंत्री हसन मुश्रीफगृह राज्यमंत्री सतेज पाटीलजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुखमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर.
सीपीआरच्या विविध प्रश्नांबाबत
मुंबईत लवकरच बैठक - मुख्यमंत्री
          कोल्हापूर दि. 22 : कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिला राजे इस्पितळाच्या (सीपीआर) विविध प्रश्नांबाबत लवकरच सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक आयोजित करु, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले. राज्यात लवकरच आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राची मुख्य इमारत आणि  वसतिगृह इमारतीचा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी  ते बोलत होते. सहकार संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर कादंबरी कवाळे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आदी  उपस्थित होते. शेंडा पार्क येथे हा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षात देशाची आर्थिक प्रगती अतिशय वेगाने होत आहे. त्याचबरोबर पायाभूत सोयी सुविधांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींनाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील वैद्यकीय सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचा भर आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी राबविण्यात येणारी एनआरएचएम सारखी योजना शहरी भागातही राबवण्याचा विचार आहे.
सीपीआर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याबाबतच्या प्रश्नावर प्रथम विचार करु. त्याचबरोबर विविध प्रश्नांबाबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, आरोग्य सेवेत चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण केंद्रामुळे चांगले मनुष्यबळ निर्माण होईल.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवर राज्य शासनाने लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपनगरांचा विस्तार होत आहे. त्यामुळे शहरात आणखी एक रुग्णालय असण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले

कोल्हापुरात रविवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य इमारत वसतिगृह इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शेजारी डावीकडून जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, महापौर कादंबरी कवाळे आदी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा