शनिवार, २१ एप्रिल, २०१२


  
राज्याच्या महत्वाच्या मुद्यांवर
पंतप्रधानांशी मुख्यमंत्री यांची चर्चा  
नवी दिल्ली, दि. 21 : महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थिती, त्यातून होणारे आर्थिक नुकसान व त्याकरिता शासनाचे नियोजन, कृषीउत्पादनांची  निर्यात अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी आज भेट घेतल्याची  माहिती श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सदन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत  दिली.
        महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत कृषी मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने  राज्याच्या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करुन, केलेल्या पाहणीबाबतची माहिती यावेळी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांना दिली.
        केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभार्थी योजनेअंतर्गत वर्ष 2011-12 मध्ये केवळ 1300 कोटीचा निधी राज्याला प्राप्त झाला असून तो मागील वर्षापेक्षा कमी असल्याबाबतची खंत  श्री.चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधानांकडे व्यक्त केली.  तसेच कृषी उत्पादन मालाच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याविषयीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.  
यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या काही महत्वाच्या निर्णयांची माहितीही दिली. त्यामध्ये राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती 50 टक्केपेक्षा जास्त आढळल्यास संबंधित शाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध फौजदारी गुन्हादाखल करुन शाळांची मान्यता रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली.
तसेच 1966 पासून शासनाने केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त होऊन 46 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सहकारी बँकेस  शासनाने एकूण 325 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे व प्रशासकांच्या विशेष प्रयत्नांमुळे, तसेच बँकेनी सर्व अटींची पूर्तता केली असल्याने सदर परवाना मिळाला व राज्य सहकारी बँकेस आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत राज्य शासन नेहमी प्रयत्नशील राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय राज्यातील खेळाडूंना आवश्यक प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय स्पर्धांकरिता तंत्रशुद्ध तयारी, राज्यातील युवकांना कल्याणकारी कार्यक्रमातून सक्षम करणे आवश्यक असल्याने, राज्य मंत्रीमंडळाने क्रीडा व युवा धोरण 2012 ला नुकतीच मंजूरी दिली असल्याची माहितीही श्री.चव्हाण यांनी दिली. जगात सर्वात जास्त युवाशक्ती असलेल्या देशातील अग्रेसर असणार्‍या महाराष्ट्र राज्यातील युवांचे, या युवा धोरणामुळे सक्षमीकरण होईल, असा विश्‍वास श्री.चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
याच वेळी संघ लोक सेवा आयोग नागरी सेवा परिक्षा 2011 ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मागील पाच वर्षांपासून, मुख्य परीक्षेत महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांकरिता अभिमत मुलाखतींचे आयोजन दिल्लीतील मराठी अधिकार्‍यांच्या पुढाकारांने होत आहे. यंदाचे वर्षी सुमारे 225 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 120 उमेदवार अभिमत मुलाखतीसाठी उपस्थित राहीले. मार्च व एप्रिल महिन्याच्या प्रत्येक शनिवारी या उमेदवारांना मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्राशी संबंधित 40 सनदी अधिकार्‍यांनी आपला बहुमोल वेळ दिला.  त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील मुलांची लोक सेवा आयोगाच्या अंतिम यादीत संख्या दरवर्षी वाढत आहे हे भूषणावह आहे. यावर्षापासून सदरचा ऐच्छिक उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत पुढे चालविला जाईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्यांच्या पुढाकाराने अशा उपक्रमांस बळ लाभले असून आपले श्रम सार्थकी लागल्याची भावना सहभागी अधिकार्‍यांनी व्यक्त केली. आजच्या शेवटच्या या अभिमत मुलाखतीसाठी उपस्थित सर्व उमेदवारांना मा.मुख्यमंत्री यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
                                                                  00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा