शुक्रवार, ९ मार्च, २०१२

Chief Minister Prithviraj Chavan today visited Lokmanya Tilak Hospital at Sion and inquired about the health of patients admitted there.


रंगबाधीत रुग्णांची
मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
सायन हॉस्पीटलला दिली मुख्यमंत्र्यांनी भेट
मुंबई, दि. 9 : धारावी येथील रंगापासून बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विचारपूस केली. सकाळी नवी दिल्ली येथून निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी  थेट सायन हॉस्पीटलला भेट दिली व वॉर्ड क्रमांक तीन व चार मधील बाधीत रुग्णांची भेट घेतली.
 यावेळी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार, आरोग्य विभागाचे अपर मुख्यसचिव जे. के. बाँठीया, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त मनिषा म्हैसकर, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, सायन हॉस्पीटलच्या अधिष्ठाता डॉ. संध्या कामत आदी उपस्थित होते.
      मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी बाधीत रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. या रुग्णामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने प्रत्येकाच्या बेडजवळ जावून त्यांनी रंग कूठून आणला..याविषयी विचारणा केली आणि प्रत्येकाला लवकर बरे हेण्याच्या शुभेच्छाही दिल्या. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टारांशी श्री. चव्हाण यांनी चर्चा केली आणि रुग्णांवर सुरू उपचाराची माहिती घेतली. सर्व रुग्णांवर वेळेत आणि तातडीने उपचार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले.
     या रुग्णांमध्ये बारावीला असलेल्या विद्यार्थीनीचा समावेश आहे. उपचार सुरू असतानाही ती परीक्षेचा अभ्यास करतेय हे पाहून मुख्यमंत्र्यांनी तिला परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या.
6 सदस्यीय चौकशी समिती
दरम्यान, या रंग बाधाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी 6 सदस्यीय समिती नेमण्यात आल्याचा माहिती मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी अधिष्ठाता कार्यालयात पत्रकारांसमवेत झालेल्या वार्तालापात सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती गंभीर नाही. एकूण 210 रुग्णांपैकी 4 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही रुग्णांना घरी देखील सोडण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यात मुंबईचे सहपोलिस आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे संचालक, उद्योग विभागाचे संचालकांचा समावेश असणार आहे. ही समितीत दोन आठवड्यात अहवाल सादर करेल. काल वापरलेला रंग तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा