गुरुवार, ८ मार्च, २०१२


धारावी रंगबाधा प्रकरणी सहा सदस्यांची
चौकशी समिती : दोन आठवड्यात अहवाल
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा

मुंबई, दि. 8 : धारावीमधील शास्त्रीनगर येथे होळीच्या रंगातून विषबाधा झालेल्या प्रकाराबाबत सहा सदस्यांची तज्ञ समिती नेमण्यात आली असून या घटनेची सखोल चौकशी व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पोलिसांनी रंगांचे एक पोते जप्त केले असून पुढील तपास तातडीने करण्यात येत आहे.
विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल केलेल्यांवर तात्काळ योग्य उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आय. एस. चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीत मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर पाटणकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबईचे पोलिस सह आयुक्त व औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे संचालक यांचा समावेश आहे.
समितीला अहवाल देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकाराशी संबंधित दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी उपाययोजना सुचविणे, याचा समितीच्या कार्यकक्षेत समावेश असेल.
कापूस निर्यात बंदी प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी नवी दिल्ली येथे गेलेल्या मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडुन या घटनेची सखोल माहिती घेतली. तसेच, सायन व राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत व उपचारांबाबतची माहिती त्यांनी घेतली.
सद्या एकुण 170 जणांना सायन रुग्णालयात  व 20 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सुधारत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करुन रंगांचे एक पोते जप्त केले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
                                                  00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा