कापूस निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाची पंतप्रधानांशी भेट
नवी दिल्ली, 7 मार्च : कापूस निर्यात बंदी मागे घ्यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांची बुधवारी रात्री भेट घेतली. 9 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
महाराष्ट्रात यंदा कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले आहे. निर्यातीवर बंदी घातल्यास कापसाचे भाव मोठया प्रमाणात घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या 5 मार्चच्या निर्णयाने शेतक-यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राज्यात आधीच कापसाच्या गाठी शिल्लक असतांना निर्यात बंदी आवश्यक नसल्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधानांची भेट घेऊन या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले.
रात्री उशिरा त्यांनी या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची देखील भेट घेतली. याशिवाय कांदयावरील किमान निर्यात दर हटविण्यात यावा, दुधाच्या भुकटीवरील निर्यातबंदीही उठविण्यात यावी आणि तूर उत्पादक शेतक-यांसाठी दोन महिन्यांसाठीच असणारा 5 टक्के बोनस पुढेही सुरु ठेवावा, विदर्भातील शेतक-यांची आत्महत्या अधिक झालेल्या जिल्हयांसाठी केंद्र सरकारकडे दिलेल्या सिंचन प्रकल्पांच्या प्रस्तावाला मंजूरी दयावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,वस्त्रोद्योग व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंकी यांचा सहभाग होता.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा